Advertisement

मुंबईत खासगी वाहनांसाठी ‘कलर कोड’ बंधनकारक!, नाहीतर पोलिसांकडून कारवाई

मुंबईच्या रस्त्यावरील वाहनांना अटकाव घालण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी नवी शक्कल लढवली असून, खासगी वाहनांसाठी ‘कलर कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे. या नियमाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

मुंबईत खासगी वाहनांसाठी ‘कलर कोड’ बंधनकारक!, नाहीतर पोलिसांकडून कारवाई
SHARES

कोरोना विषाणूच्या (coronavirus) संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात संचारबंदी लागू केलेली असली, तरी मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. खासकरून खासगी वाहनांची वर्दळ जराही कमी झालेली नाही. काही ठिकाणी तर नेहमीप्रमाणे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवत आहे. या वाहनांना अटकाव घालण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी नवी शक्कल लढवली असून, खासगी वाहनांसाठी ‘कलर कोड’ बंधनकारक करण्यात आला आहे. या नियमाची तात्काळ अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत या ‘कलर कोड’च्या अंमलबजावणीची घोषणा केली. त्यात मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, कलम १४४ नुसार मुंबई शहरात फक्त विशिष्ट कलर कोड असलेल्या गाड्यांनाच रस्त्यावर उतरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. केवळ अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी वापरात असलेल्या खासगी वाहनांसाठीच हे तीन कलरचे कोड असतील. त्याव्यतीरिक्त इतर गाड्यांना रस्त्यावर उतरण्यास मज्जाव असेल.

हेही वाचा- जाणून घ्या कुठला मास्क अधिक प्रभावी? चौथ्या नंबरचा मास्क कधीच वापरू नये

वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा कोड बंधनकारक असेल, भाजीपाला/खाद्यपदार्थ वाहून नेणाऱ्या वाहनांवर हिरवा कलर कोड असेल. तर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी पिवळा कलर कोड असेल. या कलर कोडचा दुरूपयोग केल्यास कलम ४१९ व इतर कलमांतर्गत कारवाई केली जाईल, असं देखील हेमंत नगराळे यांनी स्पष्ट केलं.

मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाचे जवान अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या व्यक्तींना, वाहनावर लावण्याकरिता 'स्टिकर' वितरित करत आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये कोडचे स्टिकर देण्यात येत असून हे स्टिकर संबंधितांनी पोलीस स्टेशनमधून घ्यावेत, असंही सांगण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी थेट रस्त्यावरच अशी वाहने थांबवून त्यांना स्टिकर लावण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

आरोग्य व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले व्यक्ती आता वाहनावर 'स्टिकर' लावून नाकाबंदीतून सुरळीतपणे मार्ग काढू शकतात. कलर कोडची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या प्रमुख एंट्री पॉइंट तसंच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. या नाकाबंदीत स्टिकरशिवाय असणाऱ्या गाड्यांची तपासणी केली जाईल.  

(color code compulsory for essential vehicle in mumbai from mumbai police)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा