Advertisement

आरेतील आग जाणीवपूर्वक लावलेली, दिंडोशी वनधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा

आग लागल्यानंतर आरे काॅलनीतील स्थानिकांनी-आदिवासींनी ही आग लागली नसून लावली गेल्याचा आरोप केला होता. वनधिकाऱ्यांच्या या दाव्यानं आता स्थानिकांच्या आरोपालाही बळकटी मिळाली आहे. त्यामुळे या आगीमागचं खरं कारण शोधून काढण्याचं आव्हान वनविभागासमोर उभं ठाकलं आहे. त्याचवेळी बर्गे यांनी घुमजाव केल्यानं या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे.

आरेतील आग जाणीवपूर्वक लावलेली, दिंडोशी वनधिकाऱ्यांचा खळबळजनक दावा
SHARES

आरे जंगलात सोमवारी रात्री लागलेली आग तब्बल ६ तासांनंतर विझली खरी, पण या आगीच्या राखेतून संशयाचा धूर निघू लागला आहे. कारण ही लाग लागली नसून आग जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप खुद्द दिंडोशी विभागाच्या वनधिकारी प्रियंका बर्गे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे. याविषयी 'मुंबई लाइव्ह'ने बर्गे यांच्याशी संपर्क साधला असता आपण असं कुठलंही वक्तव्यच केलं नसल्याचं सांगत घुमजाव केलं आहे. आग ज्या भागात लागली तो भाग खासगी मालकीचा असल्यानं मला त्याबाबतीत काहीच विधान करता येत नाही. त्यामुळे तसं विधान मी केलेलं नसल्याचंही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.


गूढ वाढलं

आग लागल्यानंतर आरे काॅलनीतील स्थानिकांनी-आदिवासींनी ही आग लागली नसून लावली गेल्याचा आरोप केला होता. वनधिकाऱ्यांच्या या दाव्यानं आता स्थानिकांच्या आरोपालाही बळकटी मिळाली आहे. त्यामुळे या आगीमागचं खरं कारण शोधून काढण्याचं आव्हान वनविभागासमोर उभं ठाकलं आहे. त्याचवेळी बर्गे यांनी घुमजाव केल्यानं या प्रकरणातील गूढ आणखी वाढलं आहे.


४ किमी आग

सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आरे काॅलनीतील आयटी पार्कजवळच्या डोंगरावर आग लागली. ही आग इतकी भीषण होती की या आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला ६ तास लागले. जवळपास ४ किमीपर्यंतही आग पसरली आणि यातूनच आगीचं भीषण रूप समोर येत आहे. दरम्यान आग विझली असली तरी आता या आगीतून आरोपाचा आणि संशयाचा धूर येण्यास सुरूवात झाली आहे. आरेतील आदिवासी आणि स्थानिकांच्या मनात सध्या मोठी भीती असून त्यांनी ही आग मुद्दाम लावल्याचा आरोप केला आहे.


विकासकामांना विरोध

आग लावल्याचा आरोप होत असतानाच दुसरीकडे यावरून राजकारणही सुरू झालं आहे. आरे जंगलात मेट्रोसह इतर विकासाची काम सुरू असून या कामांना विरोध होत आहे. त्यामुळं ही आग लावल्याची शंका व्यक्त करत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या आगीची तात्काळ उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली आहे. तर मुंबई महापालिकेकडून आगीची उच्चस्तरीय चौकशी लावण्यात आली आहे.


वनाधिकाऱ्यांचं घुमजाव

आग लावल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत असताना आता खुद्द दिंडोशीच्या वनधिकारी बर्गे यांनी आग जाणीवपूर्वक लावल्याचा आरोप एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केला खरा, पण ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यांनी घुमजाव केलं आहे.

वनविभागाच्या हद्दीला लागून असलेल्या रहेजा या खासगी कंपनीच्या मालकीच्या जागेत आग लागली. ही आग वाढू नये याची खबरदारी म्हणून आमचं ४० ते ५० जणांचं पथक आग विझवण्यासाठी गेलं आणि आम्हाला त्यात यशही आलं. असं असताना या खासगी मालकीच्या जागेवर लागलेल्या आगीबाबत मला काहीही विधान करण्याचा अधिकार नाही आणि तसं विधान मी केलेलं नाही असं बर्गे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं आहे. या आगीची चौकशी सुरू असून या चौकशीतून काय ते समोर येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा-

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायम

आरे कॉलनीजवळील डोंगरावर भीषण आग, वनसंपदा धोक्यात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा