Advertisement

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायम

आरे काॅलनीतील जंगलात लागलेली आग विझवण्यात आली असली, तरी आता या आगीवरुन राजकारण तापायला लागलं आहे. आग लागली त्या परिसरात मेट्रो आणि इतर विकासकामं सुरु आहेत. त्यामुळे आगीच्या चौकशीचीही मागणी होऊ लागली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आग लागली की लावण्यात आली? याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली.

आरे काॅलनीतील आग ६ तासांनंतर नियंत्रणात, संशयाचा धूर मात्र कायम
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनीतील जंगलात लागलेली आग अग्निशमन दल कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर तब्बल ६ तासानंतर आटोक्यात आली. या आगीत अद्याप कुणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र ही आग नेमकी कशी लागली? की कुणी जाणीवपूर्वक लावली? असा संशयाचा धूर आता पसरु लागला आहे.


कधी लागली आग?

आरे काॅलनीतील आयटी पार्कजवळील जंगलात एका डोंगरावर सोमवारी सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास ही आग लागली हाेती. बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं. ही आग ४ किमीच्या अंतरावर पसरत गेली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या त्वरीत घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. ही आग संजय गांधी नॅशनल पार्कपर्यंत पोहोचेल की काय? अशी शक्यता निर्माण झाल्याने संजय गांधी नॅशनल पार्कमधील वन अधिकारीही या आगीवर लक्ष ठेवून होते.


प्रयत्नांची शर्थ

आगीचं भीषण रुप पाहता जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तात्काळ तिथून दूर करण्यात आलं. ही आग डोंगरावर लागलेली असल्याने अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर तिथपर्यंत घेऊन जाण्यास असंख्य अडचणी येत होत्या. अखेर अग्निशमन दलाच्या १०० जवानांनी स्वयंसेवकाच्या मदतीने पायी जात ही आग नियंत्रणात आणली.


आरोप फेटाळले

आग लागल्यानंतर अग्निशमन दल उशीरा पोहोचल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मात्र आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान वेळेत घटनास्थळी पोहोचले. आगीपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागली, काही ठिकाणी जवानांना चालत जावं लागलं, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी दिली.


संशयाचा धूर

ही आग विझवण्यात आली असली, तरी आता या आगीवरुन राजकारण तापायला लागलं आहे. आग लागली त्या परिसरात मेट्रो आणि इतर विकासकामं सुरु आहेत. त्यामुळे आगीच्या चौकशीचीही मागणी होऊ लागली आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन आग लागली की लावण्यात आली? याप्रकरणी तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. अशीच मागणी आ. सुनील प्रभू यांनीही केली आहे.

तर, दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी आगीची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.हेही वाचा-

आरे कॉलनीजवळील डोंगरावर भीषण आग, वनसंपदा धोक्यात
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय