बांधकामांची ठिकाणे पुन्हा बनणार डासांचे अड्डे

  Mumbai
  बांधकामांची ठिकाणे पुन्हा बनणार डासांचे अड्डे
  मुंबई  -  

  मुंबई - इमारत बांधकामांच्या ठिकाणांसह झोपडपट्टी परिसरांमध्ये डासांकरता अळीनाशक फवारणी महापलिकेच्यावतीने करण्यात येते. परंतु यासाठी महापलिकेने खासगी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ही फवारणी करण्याचा निर्णय घेत 24 विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एका संस्थेची निवड केली आहे. परंतु या संस्थांच्या कामांवरच नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे मुंबईतील सुमारे पावणे तीन हजार बांधकामांच्या ठिकाणी होणारी औषध फवारणी कामं थांबून डासांचे अड्डे तयार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  मुंबईत उद्भवणाऱ्या हिवताप, डेंग्यू इत्यादी किटकजन्य रोगांचे प्रमाणे हे डासांमुळे वाढत असते. त्यामुळे हे प्रमाण रोखण्यासाठी इमारतींची बांधकामे सुरू असलेली ठिकाणे आणि झोपडपट्टयांमध्ये तसेच इतर ठिकाणी अळीनाशक औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात येते. महापालिकेचा किटकनाशक विभाग वेगवेगळ्या संस्थांच्या स्वयंसेवकांकडून मुंबईतील 24 विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये फवारणी करून घेत असतो. यासाठी 24 विभाग कार्यालयांमध्ये संस्थांची निवड करण्यात आली आहे. 

  यापूर्वी नेमलेल्या संस्थांची मुदत ही 1 मार्च 2017ला संपुष्ठात आली आहे. त्यामुळे पुढील अकरा आणि सहा महिन्यांकरता या संस्थांची निवड करण्यात आली आहे. यासाठी 123 संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी 106 संस्थांचे अर्ज छाननीत यशस्वी आढळून आले. या 106 मधून सोडतीद्वारे 24 संस्थांची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. याबाबतचा प्रस्ताव 6 मार्चच्या स्थायी समितीपुढे आला असता, सदस्यांनी यावर प्रश्न उपस्थित करत हा प्रस्ताव दप्तरी दाखल केला होता. परंतु प्रशासनाने आता या ज्या भागांत पाणी साचले असेल तेवढ्याच क्षेत्रफळाकरता संस्थांना पैसे दिले जाईल आणि याचे मोजमाप हे चौरस मीटरमध्ये केले जाईल, असा खुलासा करत पुन्हा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आणला आहे. अळीनाशक औषध आणि धूर फवारणीसाठी संस्थांचे स्वयंसेवक उपलब्ध न झाल्यास मुंबईत सुरू असलेल्या तसेच बंद असलेल्या एकूण 2737 इमारती बांधकामांच्या ठिकाणी डास अळीनाशक फवारणीचे काम बंद पडेल. परिणामी येणाऱ्या पावसाळ्यात मुंबईत मलेरियाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती किटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी या प्रस्तावात व्यक्त केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.