Advertisement

Exclusive- भांडुप विषबाधा प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारा कंत्राटदार विनापरवाना!


Exclusive- भांडुप विषबाधा प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारा कंत्राटदार विनापरवाना!
SHARES

भांडुपमधील सह्याद्री विद्यामंदिर या खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना गुरूवारी दुपारी अन्नातून झालेल्या विषबाधा प्रकरणी एक धक्कादायक माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या हाती आली आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवण्याचं कंत्राट ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्या कंत्राटदाराकडे अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)चा नोंदणी परवानाच नसल्याची बाब एफडीएच्या चौकशीत समोर आली आहे.


कायद्याचं उल्लंघन

शाळा आणि कंत्राटदारांकडून अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन करण्यात आलं आहेच; पण त्याचवेळी शाळा आणि कंत्राटदार कशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहेत, त्याचा फटका गुरूवारी १६ विद्यार्थ्यांना बसल्याचं समोर आलं आहे.


कधी झाली विषबाधा

गुरूवारी दुपारी गोवंडीतील सह्याद्री विद्यामंदिरमधील विद्यार्थ्यांना शाळेत सकाळी ११ च्या सुमारास जेवणात वरणभात देण्यात आला. वरणभात खाल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना पोटदुखी, मळमळ आणि उलटी यासारखा त्रास सुरू झाला. १६ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला हा त्रास सुरू झाल्याबरोबर त्यांना मुलुंडमधील अग्रवाल रूग्णालयात दाखल करण्यात आलं. या विद्यार्थ्यांची आणि शिक्षिकेची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर एफडीएचं एक पथक घटनास्थळी रवाना झालं असून या पथकाकडून रात्री उशीरापर्यंत चौकशी आणि तपासणी सुरू होती.


कुणाकडे कंत्राट?

या तपासणीत विद्यार्थ्यांसाठी जेवण ज्या कंत्राटदाराकडून जेवण बनवण्यात येत आहे त्या कंत्राटदाराकडेच परवानाच नसल्याचं स्पष्ट झाल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृन्हमुंबई), अन्न, एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. लिंगेश्वर महिला मंडळ या कंत्राटदाराकडे जेवण बनवण्याचं कंत्राट शाळेनं दिलं होतं.

अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार अन्नाशीसंबंधित कोणताही व्यवसाय करण्यासाठी एफडीएचा परवाना आवश्यक असतो. असं असताना लिंगेश्वर महिला मंडळाकडे एफडीएचा परवानाच नसल्याचं चौकशीतून पुढं आलं आहे. तर शाळेनं परवाना नसलेल्या कंत्राटदाराला कंत्राट कसं दिलं असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.


कडक कारवाई करणार

परवाना न घेता लिंगेश्वर महिला मंडळ शाळांसाठी जेवण बनवत असल्यानं हे अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन असल्यानं त्यांच्याविरोधात कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही आढाव यांनी सांगितलं. लिंगेश्वर महिला मंडळानं विना परवाना जेवण बनवण्याचं कंत्राट घेत कायद्याचं उल्लंघन केलं आहेच, पण त्याचबरोबर अन्न सुरक्षा मानके कायद्यातील अन्य तरतुदीही धाब्यावर बसवल्याचंही समोर आलं आहे.


'इथं'ही त्रुटी

लिंगेश्वर महिला मंडळाचं स्वयंपाक घर अत्यंत अस्वच्छ असल्याचं, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी होत नसल्याचं, खिडक्यांना जाळ्या न लावल्याचं अशा अनेक त्रुटीही समोर आल्याचं आढाव यांनी सांगितलं आहे. त्यामुळं आता या सर्व बाबींच्या अनुषंगानं कंत्राटदाराविरोधात एफडीएकडून कारवाई होणार आहे.


अहवालाची प्रतिक्षा

तर, दुसरीकडे ज्या वरण भातातून विषबाधा झाली त्या वरण भाताचे नमुने घेत ते तापसणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसंच वरण भात बनवण्यासाठी वापरण्यात आलेला कच्चा माल अर्थात तांदूळ, डाळ, तेल, हळद यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर नेमकी कशामुळे विषबाधा झाली हे स्पष्ट होईलच, पण त्याचबरोबर जेवण बनवण्यासाठी चांगला कच्चा माल वापरला जातो की नाही हेही समोर येणार आहे. त्यामुळे आता कंत्राटदारावर नेमकी काय कारवाई होते आणि अन्नाच्या नमुन्यांचा अहवाल काय येतो? हेच पाहणं महत्त्वाचं आहे.



हेही वाचा-

भांडुपमधील खासगी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा

फार्मसिस्ट नसल्यानेच गोवंडीत औषधबाधा?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा