शहरातील छोट्या नाल्यांकडे कंत्राटदारांची पाठ

 CST
शहरातील छोट्या नाल्यांकडे कंत्राटदारांची पाठ

मुंबई शहरातील जी/उत्तर आणि एफ/उत्तर विभागातील छोट्या नाल्यांसाठी कंत्राटदारांनी महापलिकेकडे पाठ फिरवली आहे. तब्बल सहा वेळा निविदा मागवूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे अखेर शहर भागातील धारावी,माहीम,माटुंगा, अँटॉप हिल भागातील नाल्यांच्या सफाईसाठी खासगी स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या एनजीओंमार्फत करण्यात येणाऱ्या नाल्यांच्या सफाईला स्थायी समिती सदस्यांनी तीव्र विरोध केला आहे.

मुंबईतील कंत्राटी कामगारांना पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची मागणी करणारा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला असता, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एफ/उत्तर व जी/उत्तर विभागातील छोट्या नाल्यांमधील गाळाच्या साफसफाईसाठी कंत्राटदारच न आल्यामुळे एनजीओमार्फत ही सफाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, या भागातील हे मोठे नाले असून, जर मशिनरीद्वारे सफाई न केल्यामुळे हिंदमाता, गांधी मार्केट, धारावी, माटुंगा रेल्वे स्टेशन आदी भागांमध्ये पाणी तुंबण्याची भीती राजा यांनी व्यक्त केली. यावेळी पर्जन्य जलविभागाचे प्रमुख अभियंता आणि संचालक लक्ष्मण व्हटकर यांनी या भागातील 7 ते 8 नाल्यांच्या साफसफाईसाठी निविदा मागवल्या होत्या. तब्बल सहा वेळा निविदा मागवूनही कंत्राटदार आलेले नाहीत. एफ उत्तरमध्ये दोन नाले तर जी उत्तरमध्ये सहा नाल्यांचा समावेश आहे. या नाल्यांमध्ये मशिन जात नसून, मनुष्यांचा वापर करून गाळ साफ करावा लागतो,असे सांगितले. 

एवढ्या मोठया महापालिकेमध्ये नालेसफाईसाठी कंत्राटदार येत नाही, ही धोक्याची सुचना असल्याची भीती सपाचे रईस शेख यांनी व्यक्त केली. भाजपाचे अभिजित सामंत यांनी हा दोष महापालिका प्रशासनाचा असून, पुढील वेळेस यासाठी ऑक्टोबरमध्ये निविदा काढली जावी,अशी सूचना केली तर भाजपाच्या राजेश्री शिरवाडकर यांनी एनजीओमार्फत होणाऱ्या नालेसफाईचा विरोध केला. या भागातील नाले मोठे असून, ते जर साफ झाले नाहीत तर, गांधी मार्केट आदी परिसरात पाणी तुंबेल,अशी भीती व्यक्त केली. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी एफ उत्तरमध्ये 23 हजार मीटर लांबीचे नाले असून, कंत्राटदार नसल्यामुळे आपण 12 कामगार मागितल्यानंतर ते उपलब्ध करून दिले असल्याचंही सांगितले.

अतिक्रमणांनी मोठे नाले केले छोटे

मुंबईतील सर्व माठे नाले अतिक्रमणांमुळे छोटे झाले असल्याचे सांगत मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी साकीनाका नाला आणि सत्यनगर नाला हे अतिक्रमणांमुळे छोटे झाले आहेत. पूर्वी या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकलेन मशिन जायची, परंतु आता अतिक्रमणांनी नालेच गिळले आहेत. त्यामुळे ठेकेदारांना काम करता येत नाही, परिणामी एनजीओ मार्फतच कामे करावी लागत असल्याची बाब निदर्शनास आणली.

नालेसफाईचे काम 35 टक्के पूर्ण

पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे वेगात सुरू असून, 29 एप्रिल 2017 पर्यंत मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे 35.64 टक्के एवढी पूर्ण झाली आहेत. गेल्यावर्षी हेच प्रमाण एप्रिल अखेरपर्यंत 7.59 टक्के एवढे होते. छोट्या नाल्यांचीही कामे विभाग स्तरावर ठरलेल्या वेळापत्रकानुसार व्यवस्थितपणे सुरू आहेत. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी ठरल्यानुसार पूर्ण होतील,अशी माहिती महापालिकेच्या अभियांत्रिकी सेवा आणि प्रकल्पांचे प्रभारी संचालक तथा पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे प्रमुख अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी दिली.

Loading Comments