Advertisement

३ दिवसांनंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरूवात

आता लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार पुन्हा सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

३ दिवसांनंतर सोमवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरूवात
SHARES

कोरोनाला (coronavirus) आळा घालण्यासाठी मुंबईसह संपुर्ण महाराष्ट्रात लसीकरण केलं जात आहे. लसीकरण हा कोरोनाला (covid 19) हरवण्यासाठीचा जालीम उपाय असल्यानं लसीकरण होत आहे. परंतू, पुरेशा लसींच्या साठ्याअभावी ९ आणि १० जुलै रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आता लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार पुन्हा सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेनं संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी तयारी केली आहे. विविध रुग्‍णालये व भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर) तसंच, कोरोना काळजी केंद्रे (सीसीसी) यातील रुग्‍णशय्या सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. त्यासमवेत लहान मुलांसाठीही स्‍वतंत्र असे कक्ष सर्व रुग्‍णालयं व वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्‍बो सेंटर्समध्‍ये असून, मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, यासाठी विशेष दक्ष राहण्याच्या सूचना देण्या आल्या आहेत.

जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये दुसऱ्या टप्‍प्‍यामध्‍ये अधिकाधिक नवीन रुग्‍णशय्या क्षमता विकसित करण्‍याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग, मालाड, शीव, वरळी रेसकोर्स, भायखळा, गोरेगाव नेस्‍को, वरळी एनएससीआय यांचा समावेश आहे. प्रत्‍येक जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्‍या उपलब्‍ध आहेत.

प्राणवायू सिलिंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्‍यामुळे प्राणवायूची अडचण नाही. कोविडबाधित गरोदर मातांसाठी स्वतंत्र कक्ष असून, दुसरी लाट ओसरली असली आणि लसीकरण वेगाने सुरु असले तरीही सर्व नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्‍य काळजी घ्‍यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

मुंबईत रविवारी कोरोनाबाधित १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५५५ नोंदविण्यात आली आहे, तर कोरोनामधून ६६६ रुग्ण बरे झाले असून, सक्रिय रुग्णांची संख्या शून्य आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १२ जणांना दीर्घकालीन आजार होते. यामध्ये ११ पुरुष रुग्ण होते, तर ४ महिला होत्या. ३ रुग्ण ४० वर्षांखालील होते. १० रुग्ण ६० वर्षांवरील होते. उर्वरित २ रुग्ण ४० ते ६० वयोगटांतील होते.

मुंबईत ३४ हजार ९८० चाचण्या करण्यात आल्या असून, बरे झालेल्या रुग्णांचा प्रमाण ९६ टक्के आहे. ४ ते १० जुलैदरम्यान कोविड वाढीचा दर ०.०७ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा दर ९२८ दिवस आहे. सक्रिय कंटेनमेंट झोन ५ असून, सक्रिय सीलबंद इमारती ६८ आहेत.



हेही वाचा -

मुंबई लोकल प्रवासासाठी आंदोलन

वन मुंबई मेट्रो कार्ड प्रवाशांच्या सेवेत दाखल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा