Advertisement

आता 'या' वेळेत सुरू राहतील मुंबईतील दुकाने, BMC ची सुधारीत नियमावली जारी

मुंबई महानगपालिकेने शहर-उपनगरातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी नवीन वेळा निश्चित केल्या आहेत.

आता 'या' वेळेत सुरू राहतील मुंबईतील दुकाने, BMC ची सुधारीत नियमावली जारी
SHARES

मुंबई महानगपालिकेने शहर-उपनगरातील दुकाने सुरू ठेवण्यासाठी नवीन वेळा निश्चित केल्या आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य सरकारने ५ जून २०२० पासून दुकाने सम-विषम पद्धतीने सुरू करण्याची परवानगी दिली होती. या संदर्भातील नियमावलीत पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. यासंबंधीचं परिपत्रक नुकतंच महापालिकेनं जारी केलं आहे. 

अशी असेल वेळ

देशव्यापी लाॅकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्र सरकारने नागरिकांना बऱ्याच सवलती देऊ केल्या आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करत अर्थव्यवहार पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सरकारने फेज २ प्रमाणे शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु ही दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र आता हे नियम काढून टाकत महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्यास संमती दिली आहे. परंतु दुकाने सुरू ठेवताना दुकान मालकांना काही नियमांचं पालनही करावं लागणार आहे. 

हेही वाचा- मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर 'ह्या' आयएएस अधिकाऱ्यांची नजर

माॅल बंदच

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या सुधारीत नियमावलीनुसार शहरातील सर्व मार्केट, मार्केट परिसर आणि एकल दुकाने पूर्ण वेळ उघडता येतील. परंतु मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स बंदच राहणार आहेत. तर ओपन जिममधील उपकरणे, जलतरण आणि बार यांनाही मनाई असेल. 


सम-विषम सुरूच

ही दुकाने सम- विषम या तत्वावर सुरू ठेवता येतील. म्हणजे एका दिवशी केवळ रस्त्याच्या एका बाजूची दुकानेच सुरू राहतील, तर रस्त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजुची दुकानं सुरू राहतील. यासंबंधीचं नियोजन स्थानिक प्रशासनाला करायचं आहे. त्याचसोबत दुकानांत गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं. कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, मास्क, इ. स्वच्छताविषयक नियम पाळावे लागतील. वाहतुकीची व्यवस्था देखील दुकानदारांनाच करावी लागणार आहे. असं महापालिकेने आपल्या सुधारीत नियमावलीत स्पष्ट केलं आहे.  

दरम्यान, राज्य सरकारने १० टक्के क्षमतेसह खासगी कार्यालये सुरू करण्यास आणि मुंबई महानगर परिसरात प्रवास करण्यास परवानगी दिल्यापासून मुंबईतील प्रत्येक रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली दिसत आहे. एवढंच नाही, तर कोरोनाची कुठलीही भीती मनात न ठेवता तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन करत शहरातील रस्ते, चौपाट्या इ. ठिकाणी लोकं बिनधास्तपणे गर्दी करताना दिसत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिंता देखील केली जात आहे. 

 हेही वाचा- सामाजिक अंतराच्या नियमांना न जुमानता प्रवाशांचा बेस्ट बसमधून नियमितपणे प्रवास


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा