Advertisement

आता घरपोच मिळेल दारू, होम डिलिव्हरीला सरकारची परवानगी

आता सावध पावलं टाकत राज्य सरकारने मद्याची होम डिलिव्हरी (home delivery) करण्यास मद्यविक्रेत्यांना (liquor) सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे आता तळीरामांना कुठलीही रांग न लावता थेट घरपोच दारू मिळणार आहे.

आता घरपोच मिळेल दारू, होम डिलिव्हरीला सरकारची परवानगी
SHARES

महसूल मिळवण्याचं उत्तम साधन म्हणून राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मद्य विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. परंतु वाईन शाॅपच्या (wine shop) बाहेर गर्दी उसळून सोशल डिस्टन्सिंगचा (social distincing) फज्जा उडाल्यावर सरकारला एका रात्रीत आपला निर्णय मागे घ्यावा लागला हाेता. यावरून सरकारला बरीच टीकाही सहन करावी लागली होती. परंतु आता सावध पावलं टाकत राज्य सरकारने मद्याची होम डिलिव्हरी (home delivery) करण्यास मद्यविक्रेत्यांना (liquor) सशर्त परवानगी दिली आहे. यामुळे आता तळीरामांना कुठलीही रांग न लावता थेट घरपोच दारू मिळणार आहे. 

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल, अशी माहिती दिली आहे. मात्र मद्यविक्रीचा परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येईल, तर ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य उत्पादन शुल्काच्या साईटवर आॅनलाईन परमिटची सुविधा उपलब्ध आहे.

घरपोच सेवा

याबाबतचा परिपत्रक गृहविभागाने (home ministry) ११ मे २०२० रोजी काढलं आहे. या परित्रकात म्हटलं आहे की, महाराष्ट्र शासनास प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मुंबई विदेशी मद्य नियम १९५३ अंतर्गत मंजूर केलेल्या अनुज्ञप्ती नमुना एफएल २, एफएल/बीआर २, एफएल/डब्ल्यू २ अनुज्ञप्तीधारक खालील अटी शर्तींच्या अधीन राहून भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरिट्स, बीअर, सौम्य मद्य, वाईनची विक्री परवानाधारकास त्याच्या पत्त्यावर घरपोच देईल. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या नावाने हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. 

हेही वाचा - 'या' जिल्ह्यात मध्यविक्रीसाठी आता ई-टोकण सेवा सुरू

अटी-शर्ती पुढीलप्रमाणे:

  • जो अनुज्ञप्तीधारक भारतीय बनावटीचं विदेशी मद्य-स्पिरिट्स, बीअर, सौम्य मद्य, वाईन या प्रकाराची विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करतो, केवळ त्या मद्य प्रकाराची विक्री करेल.
  • विहीत केलेल्या दिवशी व वेळेत अनुज्ञप्तीधारक विदेशी मद्याची विक्री व वितरण केवळ त्याच्या अनुज्ञप्ती आवारातून करेल.
  • परवानाधारकाने संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली तरच परवानाधारकास अशा मद्याचं वितरण अनुज्ञेय मद्याचं परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल.
  • अशा मद्याच्या विक्रीकरीता घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्ती मास्कचा वापर व वेळोवळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करतील, याची दक्षता अनुज्ञप्तीधारक घेईल.
  • राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (२००५ चा ५३ वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले लाॅकडाऊनचे आदेश अस्तीत्वात असेपर्यंत हे आदेश लागू वा अस्तीत्वात राहतील. 
  • शासन स्वेच्छेने कधीही सदरचे आदेश सुधारीत किंवा रद्द करू शकेल.

नियमांची ऐसीतैशी

केंद्र सरकारने ३ मेनंतर काही अटी शर्थींच्या आधारे लाॅकडाऊनमध्ये अशंत: सवलत देऊ केली होती. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या इतर दुकानांसोबतच महाराष्ट्रात मद्यविक्रीचा परवाना असलेल्या विक्रेत्यांना वाईन शाॅप उघडण्यास सशर्त संमती देण्यात आली होती. परंतु मद्य विकत घेताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्यावर मुंबई-पुणे आणि इतर शहरांमधील मद्यविक्री ताबडतोब बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिल्याने तळीरामांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय शासनाच्या तिजोरीतही भर पडणार आहे.

हेही वाचा - अबब ...! अवघ्या दोन दिवसात राज्यात 62 कोटी 55 लाखांची मद्यविक्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा