कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं असून, वाहतूक सेवा, कंपन्या बंद असल्यानं प्रदुषणात कमालीची घट झाली आहे. लॉकडाऊनचे निसर्गावर चांगले परिणाम दिसून येत आहेत. हवेची गुणवत्ता सुधारली असून, मुंबईतील धुलीकणांचं प्रमाण अर्ध्यावर आलं आहे. तर चेंबूर, बीकेसी सारख्या सर्वात प्रदूषित भागातील हवा देखील सुधारली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वायू वैविध्य सर्वेक्षण व संशोधन प्रयोगशाळेमार्फत मुंबईतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्वेक्षण केलं जातं. यांच्यामार्फत हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.
कचराभूमी आणि सर्वात वर्दळीच्या वाहतूक नाक्यांवरील हवेची गुणवत्ता स्वयंचलित वाहनामार्फत तपासली जाते. ‘सफर-मुंबई’ या उपक्रमाद्वारे या माहितीचं विश्लेषण करून अहवाल तयार केला जातो. चालू वर्षांतील ६ महिन्यांच्या माहितीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये लॉकडाऊनच्या ३ महिन्यांचा ही समावेश आहे.
हवेतील गुणवत्ता तपासताना प्रति घनमीटरमध्ये २४ तासांतील हवेच्या धुलीकणांचं प्रमाण पाहिलं जातं. चेंबूर, भांडूप, बोरिवली, बीकेसी, कुलाबा, अंधेरी, मालाड, माझगाव, वरळी अशा ९ ठिकाणी ही गुणवत्ता दर दिवशी मोजली जाते. त्यानुसार, केलेल्या निरीक्षणावरून जानेवारीमध्ये सर्व केंद्रांवर घनमीटरला ९४ ते २०५ मायक्रोग्रॅम असं प्रमाण होतं. चांगल्या हवेसाठी घनमीटरला १०० मायक्रोग्रॅम असे निर्धारित मानक आहे. अहवालात जानेवारी ते मे या ५ महिन्यांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला आहे.
मुंबईत हे प्रमाण मात्र जास्त असते. परंतु, मे महिन्यात हेच प्रमाण घनमीटरमध्ये २७-६८ मायक्रोग्रॅम इतकं खाली आलं आहे. लॉकडाऊनमध्ये बांधकाम, उद्योगधंदे, वाहतूक, दळणवळण बंद असल्यानं प्रदूषण कमी झालं आहे. गेल्या १० वर्षांचा विचार करता प्रदूषण वाढीस जबाबदार असलेले उद्योगधंदे, वाहतूक यावर योग्य नियंत्रण ठेवल्यास प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होणार असल्याचं या अहवालात सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा -
दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिलं हे उत्तर
लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक करणाऱ्या ८० हजार ५३२ जणांची वाहतूक जप्त