Advertisement

'जेजे'त रुग्णालयात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारण्यात येणार


'जेजे'त रुग्णालयात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारण्यात येणार
SHARES

दक्षिण मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी रुग्णालय परिसरात 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारकडे करण्यात मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जे. जे. रुग्णालय आणि रुग्णालय परिसरातील इमारतींच्या भागात दरवर्षी पावसाचे लाखो लिटर पाणी वाहून जाते. तसेच हे पाणी रुग्णालयाच्या परिसरात साचते. त्यामुळे रुग्णांसह डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

यंदा ५ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात जे.जे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील तळ मजल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबले होते. त्यामुळे रुग्णांसह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. रुग्णालय परिसरात अनेक वर्षे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. मात्र, थेट रुग्णालयात पाणी शिरण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला. महापालिकेने पंपाची व्यवस्था करत पाण्याचा निचरा केला. मात्र, असे प्रकार प्रत्येक पावसाळ्यात झाल्यास रुग्णालयाला त्रासदायक ठरणार असल्याने या विभागातील नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी सरकारकडे रुग्णालय परिसरात रेन वाॅटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे.

जे. जे. रुग्णालय परिसरात वैद्यकीय उपचार इमारतींसह डाॅक्टर व कर्मचारी वसाहत देखील आहे. हा भाग उंच आणि सखल भागावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात इमारतींच्या गच्चीवरून मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून येते. तसेच उंचावरील भागातून सखल भागात पाणी वाहून येते. त्यामुळे रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते.

पावसाच्या पाण्याचा योग्यप्रकारे निचरा करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे रुग्णालय इमारतीसह कामगार, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी वसाहतींमधून वाहून येणाऱ्या लाखो लिटर पाण्याची बचत करता येईल, अशी माहिती जामसुतकर यांनी पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंगमधून बचत झालेले पाणी सार्वजनिक स्वच्छता व पिण्याव्यतिरिक्तच्या अन्य कामांसाठी वापरता येऊ शकते. तसेच रुग्ण आणि डॉक्टरांचे कपडे धुण्यास, उद्यानात हे पाणी वापरता येईल. हा प्रकल्प राबवल्यास रुग्णालय परिसरात पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल, असे जामसुतकर यांनी स्पष्ट केले. याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्र्यांसह, आरोग्य संचालक, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम विभागालाही देण्यात आले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा