Advertisement

मुंबईत दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत घट

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, जसजशी रुग्णांच्या संख्येत घट होतेय तसतशी चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत घट
SHARES

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, जसजशी रुग्णांच्या संख्येत घट होतेय तसतशी चाचण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात घट होत असल्याची माहिती समोर येत आहे.

तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला त्यावेळी मुंबईत दैनंदिन चाचण्यांची संख्या ही ६८ ते ७० हजारांवर गेली होती. परंतु आता हे प्रमाण थेट ४७ हजारांपर्यंत खाली आले आहे.

मुंबईत डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून तिसरी लाट वेगानं पसरायला सुरुवात झाली. या काळात दैनंदिन बाधितांची संख्याही ३ ते ४ दिवसांत दुप्पट होत होती. त्यामुळं चाचण्यांचं प्रमाणही हळूहळू वाढून डिसेंबरच्या शेवटी दरदिवशी सुमारे ५० हजारापर्यंत गेले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तर तिसऱ्या लाटेने उच्चांक गाठला आणि दैनंदिन रुग्णसंख्या २० हजारांच्या घरात गेली.

परिणामी बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्याही वेगाने वाढत गेली आणि दैनंदिन चाचण्यांची संख्या ७० हजारांच्याही वर गेली. ६ जानेवारीला शहरात ७२ हजार ४४२ चाचण्या एका दिवसांत केल्या गेल्या असून मुंबईत कोरोनाच्या साथीमध्ये सर्वाधिक चाचण्या या काळात करण्यात आल्या.

या काळात प्रतिजन चाचण्यांचे प्रमाणही वाढले असून दिवसभरात केलेल्या चाचण्यांमध्ये जवळपास २० हजार प्रतिजन चाचण्या केल्या जात होत्या. जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापासून दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वेगाने खाली येऊ लागला, तसा चाचण्यांचा आलेखही पुन्हा खाली आला आहे. मागील तीन ते चार दिवसांत तर शहरात दैनंदिन चाचण्यांची संख्या ४८ हजारांच्यापुढे गेलेली नाही.

शहरातील संसर्ग प्रसाराचा वेग कमी झाला असला तरी अद्याप दर दिवशी ५ हजार रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे अजूनही चाचण्यांवर भर देणे गरजेचे आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा