
मुंबई आणि कोकणदरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवणारी CSMT-सावंतवाडी रोड दैनिक एक्स्प्रेस अखेर सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी या नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुमारे 510 किलोमीटरचा प्रवास करणारी ही ट्रेन मुंबईला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांशी जोडणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या हजारो प्रवाशांना आणखी एक रेल्वे पर्याय उपलब्ध झाला आहे.
या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड यांसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
या नव्या सेवेमुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी, कर्मचारी आणि कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रेल्वेसेवेला मोठे महत्त्व आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याचे सांगितले. प्रवाशांची गरज वाढल्यास विशेष रेल्वेगाड्यांची संख्या 370 पेक्षा अधिक करण्याची तयारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी या दैनिक रेल्वेसेवेमुळे मुंबई आणि कोकणातील सामाजिक तसेच आर्थिक संबंध आणखी मजबूत होतील, असे सांगितले. यामुळे पर्यटन, व्यापार आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, मुंबईतील रेल्वे पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सुमारे 18 हजार कोटी रुपयांची कामे सुरू असल्याची माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली. 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे आणि सिग्नलिंग यंत्रणा अद्ययावत करण्याची कामे यामध्ये समाविष्ट आहेत.
मुंबई-कोकण प्रवाशांसाठी आता आणखी एक रोजची रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने गणेशोत्सवाच्या काळातही प्रवासाचा मोठा भार कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
