सीटीस्कॅॅन, एमआरआय करा निम्म्या शुल्कात!

 Mumbai
सीटीस्कॅॅन, एमआरआय करा निम्म्या शुल्कात!
Mumbai  -  

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या 'वन रुपी क्लिनिक'मध्ये आता रेल्वे प्रवासी आणि रुग्णांना निम्म्या शुल्कात वैद्यकीय चाचण्यांची सोय उपलब्ध होणार आहे. ज्या वैद्यकीय चाचण्यांसाठी बाहेर रुग्णांना किमान 3 ते 5 हजार रुपये मोजावे लागतात, अशा महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्या केवळ दीड ते 3 हजार रुपयांमध्ये करून मिळणार आहेत. 'वन रुपी क्लिनिक'चे संचालक डॉ. राहुल घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून हा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून मुंबईत या सेवेला सुरूवात झाली.

घाटकोपर, मुलुंड, कुर्ला या केंद्रांमध्ये आरोग्य तपासणीकरता खास कक्ष तयार करण्यात आला आहे. येथे थायरॉईड, कर्करोग, त्वचाविकार, जनुकीय दोष इ. आजारांवरील वैद्यकीय चाचण्या निम्या किंमतीत होणार असल्याचं 'वन रुपी क्लिनिक'चे संचालक डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केलं आहे. क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीकरता प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील. नमुने घेत असताना रुग्णांची सर्व माहिती डॉक्टर स्वत: नोंदवतील. या चाचण्यांचे अहवाल रुग्णांच्या हाती सोपवण्यासोबतच रुग्णांच्या ई-मेलवरही पाठवण्यात येतील. ऑनलाईन अहवालातून वेळेची बचत होईल.

खासगी ठिकाणी वैद्यकीय चाचण्यांकरता मनमानीपणे शुल्क आकारले जातात. तरीही नाईलाजाने रुग्णांना चाचण्या कराव्याच लागतात. पण, 'वन रुपी क्लिनिक'च्या माध्यमातून रुग्णांची ही लूट थांबणार आहे. रुग्णसेवेचे ध्येय समोर ठेऊन मुंबईतील काही महत्त्वाच्या स्थानकांवर 'वन रुपी क्लिनिक' सेवा सुरू करण्यात आली आहे.

या क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्णांच्या तपासणीतून काहींना उच्च रक्तदाब, मधुमेहासारखे आजार असल्याचं समजलं. मात्र यापैकी कित्येक रुग्णांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना वैद्यकीय तपासण्या करणं देखील कठीण असल्याचं यातून समोर आलं. हीच समस्या लक्षात घेऊन 'वन रुपी क्लिनिक'ने रुग्णांना निम्म्या किमतीत वैद्यकीय चाचण्या करण्याचं ठरवलं आहे.

सरकारी रुग्णालयात सीटीस्कॅन, एमआरआयकरता प्रचंड वेळ जातो. याचाच फायदा घेऊन रुग्णांकडून जास्त पैसे घेतले जातात. पण, 'वन रुपी क्लिनिक'मध्ये सीटीस्कॅन, एमआरआयची सुविधा देखील निम्या किंमतीत उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याचं डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं. सीटीस्कॅॅनचे शुल्क खासगी रुग्णालयात 3 हजार रुपये असेल तर 'वन रुपी क्लिनिक'मध्ये हीच चाचणी 1500 हजार रुपयांपर्यंत करुन मिळेल. तसंच एमआरआयसाठी 5 हजार रुपये शुल्क असेल तर ते 3 हजार रुपयांत करुन मिळेल, असं डॉ. राहुल घुले यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

Loading Comments