Advertisement

मुंबईतील 7 हजार 200 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

समुद्रालगत राहणाऱ्या वरळी, माहीम, दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहेत.

मुंबईतील 7 हजार 200 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर
SHARES
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन मुंबईच्या समुद्र किनाऱ्यानजीक राहणाऱ्या 7 हजार 200 रहिवाशांचेे प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे. या सर्वांच्या निवासाची व्यवस्था महापालिका प्रशासनाने केली आहे. मुंबई महापालिकेतर्फे सुमारे 35 शाळांमध्ये (bmc arranges 35 schools as temporary shelters for mumbaikars ahead of cyclone nisarga ) नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

रायगड, अलिबाग परिसरात ‘निसर्ग चक्रीवादळा’ने धडक दिली आहे. या वादळाने दुपारी दोनच्या सुमारास समुद्रातून जमिनीवर प्रवेश केला असून या चक्रीवादळाचा परिघ 50 ते 60 किमीपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई समुद्र किनाऱ्यावरही जोरदार वारे वाहू लागले आहे. समुद्रही खवळला आहे. अलिबागहून पुढं सरकत असलेल्या चक्रीवादळाची तीव्रता देखील वाढत आहे. मुंबई, ठाणे किनारपट्टी भागात पोहोचल्यावर प्रतितास 100 ते 120 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचा परिणामही जाणवायला लागला असून कुलाबा , कफ परेड, नरिमन पाॅईंट, वरळी, माहीम इत्यादी परिसरातील झाडे जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडत आहेत. आपातकालीन परिस्थिती उदभवल्यास त्याचा सामना करण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाला अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले असून मुंबईतील 6 समुद्र किनाऱ्यांवर 93 जीवरक्षकांना तैनात करण्यात आले आहेत. तर मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या 8 आणि नौदलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा (Ward A), वरळी (G/South), वांद्रे (H/East), मालाड (P/South), बोरीवली (R/North) या भागात प्रत्येकी 1 आणि अंधेरीत (K/West) 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

या निसर्ग चक्रीवादळामुळे समुद्रालगत राहणाऱ्या नागरिकांची दक्षता म्हणून  प्रशासनाने किनाऱ्या लगतच्या नागरिकांचे स्थलांतर केले. त्या बरोबरच दहा  पथके चक्री वादळामुळे होणाऱ्या नुकसानामध्ये मदत करण्यासाठी तयार केली होती. समुद्रालगत राहणाऱ्या वरळी, माहीम, दादर अशा भागांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. यात ई- विभाग,कोवळा बंदर, मिरा दातार दर्गा, भांडारवडा येथील  1200, जी/उत्तर विभाग ,पंजाबी कॉलनी , सायन कोळीवाडा बंगाली पुरा  झोपडपट्टी,सायन,माहीम 1200, एफ/उत्तर विभाग वडाळा, 350, जी/दक्षिण वरळी 250, ए विभाग, गिता नगर,गणेशमूर्ती नगर 3000, डी विभाग, दर्या नगर, शिवाजी नगर, सागर नगर, रामकुंड नगर 1200, अशा 7200 लोकांना ठिकठिकाणी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. तर, मुंबई महापालिकेतर्फे सुमारे 35 शाळांमध्ये नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. आपत्कालीन स्थितीत मुंबईकर नागरिक हेल्पलाईन क्रमांक 1916 डायल करून त्यानंतर 4 दाबून आवश्यक ती मदत मागू शकतात, असं सांगण्यात आलं आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा