Advertisement

भोईवाड्यातील धार्मिक स्थळावर कारवाई


भोईवाड्यातील धार्मिक स्थळावर कारवाई
SHARES

भोईवाडा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने भोईवाड्यातील 35 वर्ष जुन्या एका धार्मिक स्थळावर बुधवारी तोडक कारवाई केली. येथील विश्वस्तांनी सर्व पुरावे पालिका अधिकाऱ्यांना दाखवले. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत असल्याचा हवाला देत पालिका अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने धार्मिक स्थळ भुईसपाट केले. सबळ पुरावे असताना कारवाई होत असल्याचे पाहून भक्तांनी परिसरात एकच गर्दी केली. त्यामुळे येथे काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
ग. द. आंबेकर मार्गावरील पदपथावर असलेले हे धार्मिक स्थळ 1982 साली बांधण्यात आले. तर 1986 साली येथील स्थानिकांनी एक कमिटी बनवून याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे केली. ‘धार्मिक स्थळ अधिकृत असताना ते अनधिकृत ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत पाडण्यात आले', असे ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश मोरे आणि सचिव अशोक चव्हाण यांनी सांगितलं. यावर पालिका अधिकाऱ्यांनी तोडगा न काढल्यास परळ - भोईवाडा नाक्यावर अथवा पालिका एफ - दक्षिण विभाग कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार' असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा