Advertisement

लोअर परळ पुलावरून सेना-मनसेमध्ये रंगला सामना


लोअर परळ पुलावरून सेना-मनसेमध्ये रंगला सामना
SHARES

लोअर परळ पूल धोकादायक असल्यानं मंगळवारपासून वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला अाहे. त्यामुळं प्रवाशी, पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. गुरूवारी सकाळी रेल्वे, पालिका आणि वाहतूक विभाग यांच्याकडून लोअर परळ पुलाची संयुक्तिक पाहणी करण्यात येणार होती. त्यानुसार या पाहणीसाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील शिंदे, सेनेचे नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांनीही हजेरी लावली. तर मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनीही मनसैनिकांसह इथं धाव घेतली.


सेना-मनसे भिडले

पूल बंद झाल्यानं पादचारी-प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी काय करता येईल, यावर अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी सेनेकडून धोकादायक पुलाचा भाग वगळत, तिथं लाल पट्ट्यानं खुणा करत तो बंद करून उर्वरीत भाग पादचाऱ्यांसाठी खुला करावा अशी मागणी करण्यात आली. यावर चर्चा सुरू असताना अधिकारी, मनसे आणि सेना यांच्यात अचानक वादावादी झाली. पुढं हे प्रकरण वाढलं नि सेना-मनसे एकमेकांना भिडले. पण पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण योग्य प्रकारे हाताळण्यानं कोणताही मोठा अनुचित प्रकार इथं घडला नाही.


मनसेची घुसखोरी - अा. शिंदे

आमच्या पाहणी दौऱ्यात मनसेनं घुसखोरी करत अधिकाऱ्यांवर हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला आहे. तर धुरी यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. लोअर परळ पुलाचा प्रश्न स्थानिकांचा, नागरिकांचा आहे, ना कुणा सत्ताधारी पक्षाचा. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनीच केवळ पाहणी करावी आणि निर्णय घ्यावेत असं होत नाही. त्यामुळं आम्ही कसलीही घुसखोरी केली नसल्याचं धुरी यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना स्पष्ट केलं आहे.


अारोप चुकीचा - धुरी

तर आम्ही कुठंही अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न केला नाही. चुकीचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न मनसे कधीच करत नाही. कारण मनसे मारायचं असेल तर मारूनच येते, रिझल्ट देते हे याआधी पाहिलेलं आहे. त्यामुळं मारण्याचा प्रयत्न केला हा आरोपही चुकीचा असल्याचं धुरी यांनी सांगितलं आहे. तर शिंदे यांनी मात्र मनसेला नाक खुपसण्याची गरज नव्हती असं म्हणत नेहमी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मसनेला सेनेनं गुरूवारी दणका देऊन अधिकाऱ्यांना मारण्याचा डाव शिवसैनिकांना हाणून पाडला असंही म्हटलं आहे.


लोकप्रतिनिधींकडून  राजकारण
 

लोअर परळ पर्यायी व्यवस्था नसल्यानं गैरसोयीचं रूपांतर त्रासात होताना दिसत आहे. त्यामुळं पर्यायी व्यवस्था निर्माण करता येईल का याचा विचार रेल्वे, पालिका, वाहतूक विभाग, स्थानिक प्रतिनिधी, राजकीय पक्षांकडून होण्याची गरज आहे. पण प्रत्यक्षात मात्र असा विचार करण्याएेवजी लोकप्रतिनिधी-राजकीय पक्षांकडून याचं राजकारण करत हाणामारी करण्यातच कसे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते रमले आहेत हेच गुरूवारी लोअर परळ पुलावर दिसून आलं.



हेही वाचा -

मराठा क्रांती मोर्चा : नवी मुंबईत इंटरनेट सेवा बंद

'त्या' महिला कैद्यांना अन्नबाधा नाहीच!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा