Advertisement

खड्डयात कोल्डमिक्सऐवजी चक्क पेव्हरब्लॉक


खड्डयात कोल्डमिक्सऐवजी चक्क पेव्हरब्लॉक
SHARES

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने रस्त्यांवरील खड्डयांनी पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यापुढे रस्त्यांवर खड्डे दिसणारच नाही, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. 

मात्र, काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या वांद्रे पश्चिम येथील मेहबूक स्टुडीओजवळील चौकांमध्ये खड्डे पडले असून विशेष म्हणजे या खड्डयांच्या पोटात १०० गोण्या कोल्डमिक्स ओतल्यानंतर त्यांची भूक थांबलेली नाही. पुन्हा या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्डयात आता कोल्डमिक्सऐवजी चक्क पेव्हरब्लॉक टाकून महापालिकेने आपली लाज झाकण्याचा प्रयत्न करत आहे.


कंत्राटदार काळ्या यादीत

वांद्रयातील काँग्रेसचे नगरसेवक आसिफ झकेरिया यांनी स्थायी समितीच्या बैठकीत आपल्या प्रभागातील कैफियत मांडून मे महिन्यात केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणले. या भागातील रस्त्यांसाठी तसेच खड्डयांसाठी एकाच कंत्राटदाराची नेमणूक झाली होती.परंतू या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे त्याला काळ्या यादीत टाकण्यात येत आहे. मात्र, कंत्राटदार निघून गेला पण या भागातील खड्डयांची समस्या निर्माण झालेली आहे. सध्या या भागात खड्डे बुजवण्यासाठीही कंत्राटदार नसून हे खड्डे विभाग स्तरावर बुजवले जात आहेत.


१०० गोण्या कोल्डमिक्स वाया

या रस्त्यांवर खड्डयांचं जाळं निर्माण झाल्यामुळे २६ जुन रोजी तब्बल १०० गोण्या कोल्डमिक्स ही जर्मनी टेक्नॉलॉजीचं अस्फाल्ट वापरण्यात आलं. परंतु काहीच अवघ्या दोनच दिवसांमध्ये ते पुन्हा वाहून गेलं. त्यामुळे अखेर या खड्डयांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून ते बुजवले जात असल्याचे आसिफ झकेरिया यांनी म्हटले आहे. एका बाजुला आपण पेव्हरब्लॉक काढून टाकत आहे, तर दुसरीकडे याच पेव्हरब्लॉकचा वापर खड्डयांमध्ये करत आहोत. मग कोटयवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या रस्त्यांचा उपयोग काय असा सवाल झकेरिया यांनी केला आहे.


प्रत्येक विभागात खड्डे

मुंबईतील ८० टक्के रस्त्यांची कामे सुरु असल्याने किंवा पूर्ण झाल्यामुळे ते हमी कालावधीतील आहेत. तरीही खड्डयांची समस्या कमी झालेली नसून प्रत्येक विभागांमध्ये अशाचप्रकारे खड्डे पडल्याचे दिसून येत असल्याचे शिवसेनेचे सदा परब यांच्यासह इतर नगरसेवकांनी सांगितले.



हेही वाचा -

अंधेरी पुलाच्या दुघर्टनेचं खापर भाजपानं फोडलं पालिकेवर

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : विद्यापीठानं घेतली 'त्या' अपंग विद्यार्थ्याची दखल



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा