Advertisement

विरोधाच्या भीतीने कोस्टल रोडचा प्रस्ताव ‘स्थायी’ ने ठेवला राखून

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचं काम ‘लार्सन अँड टुब्रो’ला (एल अँड टी) आणि बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे सागरी सेतूचं टोक या भागाचं काम हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) व एचडीसी या संयुक्त कंपनीला मिळालं आहे.

विरोधाच्या भीतीने कोस्टल रोडचा प्रस्ताव ‘स्थायी’ ने ठेवला राखून
SHARES

 मुंबई महापालिकेच्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पासाठी (कोस्टल रोड) कंत्राटदारांची निवड केल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे तातडीने ठेवल्यानंतरही तो पुन्हा एकदा राखून ठेवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाला विरोधी पक्षांच्यावतीनं तीव्र विरोध होणार आहे. याच भीतीनं सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.


पैशांची उधळपट्टी

यामध्ये कंत्राटदाराला ३० टक्के अधिक दराने कंत्राट दिलेलं आहे. ही म्हणजे करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी असून इतर कंत्राटदारांशी वाटाघाटी करणाऱ्या प्रशासनाने याठिकाणी कंत्राटदाराशी वाटाघाटी करून त्यांना कंत्राट किंमत कमी करायला का लावली नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.


१२,७२१ कोटींचं कंत्राट

कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रिन्सेस स्ट्रीट ते बडोदा पॅलेसपर्यंतचं काम ‘लार्सन अँड टुब्रो’ला (एल अँड टी) आणि बडोदा पॅलेस ते वरळी-वांद्रे सागरी सेतूचं टोक या भागाचं काम हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी (एचसीसी) व एचडीसी या संयुक्त कंपनीला मिळालं आहे. तब्बल १२ हजार ७२१ कोटी रुपयांच्या या कंत्राटाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेपुढे मंजुरीसाठी तातडीनं ठेवण्यात आला होता. परंतु शुक्रवारी झालेल्या या सभेत या प्रस्तावावर निर्णय घेण्याऐवजी अध्यक्षांनी तो प्रस्ताव राखून ठेवला.
 


नरीमन पॉईंट ते मालाड 

मुंबईच्या नरीमन पॉईंट ते मालाड मार्वेपर्यंत समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून मुंबई किनारा रस्ता प्रकल्पांचं काम हाती घेतलं जाणार आहे. त्यापैकी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे वरळी सागरी सेतूच्या दक्षिणेकडील टोक या ९.९८ किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडचं काम महापालिका करणार अाहे. या निविदेमध्ये पॅकेज ४ आणि पॅकेज १ साठी लार्सन अँड टुब्रो तर पॅकेज २ साठी एचसीसी व एचडीसी कंपनी पात्र ठरली आहे.


फेरनिविदा मागवावी

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मात्र आपला विरोध दर्शवला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाला काँग्रेसचा अथवा विरोधी पक्षांचा विरोध नाही. परंतु या प्रकल्पाचं अंदाजित दरापेक्षा अधिक दराने कंत्राट देण्यात आलं आहे. हा करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग आहे. जर प्रशासन सर्व कंत्राटदारांशी वाटाघाटी करत अाहे तर मग वाटाघाटी करून आपल्या दरामध्ये काम करण्यास का सांगितलं नाही, असा सवाल त्यांनी केला. वाटाघाटीच्या नावाखाली कंत्राटदार पालिकेला लुटत चालले असून ही पध्दतच बंद केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या दरामध्ये कंत्राटदार काम करणार नसेल तर फेरनिविदा मागवली जावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे.


प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी उद्यान (पॅकेज ४) : एल अँड टी (४२२० कोटी रुपये)

प्रियदर्शनी उद्यान ते बडोदा पॅलेस (पॅकेज १) : एल अँड टी (५२९० कोटी रुपये)

बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सागरी सेतूचे दक्षिणेकडील टोक (पॅकेज २) : एचसीसी-एचडीसी (३२११ कोटी रुपये)



हेही वाचा -

धक्कादायक! मुंबईतील रेल्वेमार्गावरील केवळ ६ उड्डाणपूलच भक्कम

मुंबईतील उद्यानांची वेळ वाढवली, दुपारी १२ ते ३ मध्येच राहणार बंद




 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा