Advertisement

शिक्षकांचं निवृत्ती वेतन महिनाभरात देण्याचे अादेश


शिक्षकांचं निवृत्ती वेतन महिनाभरात देण्याचे अादेश
SHARES

मुंबई महापालिकेच्या शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकांना वर्षानुवर्षे निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवणाऱ्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा तीव्र निषेध करून गुरुवारी शिक्षण समितीची बैठकच तहकूब करण्यात अाली. कारकुनी काम करूनही निवृत्त शिक्षकांच्या समस्या कायम असल्यामुळे शिक्षण समितीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या एक महिन्याच्या आत शिक्षकांचे निवृत्ती वेतनाची प्रकरणे निकालात काढून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी दिले आहेत.


अनेक वर्षांपासून निवृत्ती वेतन नाही

सुमारे १५०० निवृत्त शिक्षकांना अनेक वर्षे उलटली तरी त्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळालेला नाही. हक्काचे पैसे न मिळाल्यानं त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत असल्याची खंत शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी व्यक्त केली. शेकडो प्रकरणं प्रलंबित असून शिक्षण विभागाचे कर्मचारी या शिक्षकांकडे लक्षच देत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून ही सभा तहकूब करण्याची मागणी त्यांनी केली.


शिक्षणाधिकाऱ्यांचे वेतन रोखा

महापालिकेच्या वतीनं कारकुनी कामं करण्यासाठी २१ जणांचा कर्मचारी वर्ग देऊनही कोणताही फरक दिसून येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचारी आणि शिक्षणाधिकारी यांचे वेतन रोखा. म्हणजे वेतन न मिळाल्याचे दु:ख काय असते, हे शिक्षणाधिकारी अाणि कर्मचाऱ्यांना कळेल, असं शिवसेनेच्या अंजली नाईक यांनी सांगितलं.


२१ कर्मचारी देऊनही कामं प्रलंबित

अायुक्तांनी २५ पैकी २१ कर्मचारी मंजूर करूनही निवृत्ती वेतनाची प्रकरणं प्रलंबित अाहेत. शिक्षण समिती यापुढे हे खपवून घेणार नसून एका महिन्याच्या अात १५०० शिक्षकांची निवृत्ती वेतनाची प्रकरणं निकालात काढावीत. यापुढे कोणत्याही निवृत्त शिक्षकाला त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण विभागाला सादर करण्याचे अादेश शुभदा गुढेकर यांनी शिक्षण विभागाला दिले अाहेत.



हेही वाचा -

लाखो डीएड बेरोजगार, पण नवी मुंबई पालिकेला हवेत निवृत्त शिक्षक!

कॉलेज बंक आता अशक्य! बायोमेट्रिक हजेरी लावावी लागणार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा