पेंग्विनसाठी 50 रुपये आणि राणीच्या बागेसाठी 20 ते 25 रुपयांचे शुल्क?

 Byculla
पेंग्विनसाठी 50 रुपये आणि राणीच्या बागेसाठी 20 ते 25 रुपयांचे शुल्क?

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पाहुण्या पेंग्विनच्या दर्शनासाठी तिकीट दरात वाढ करण्याच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपात शुक्रवारी चांगलीच जुंपणार आहे. तिकीट दरवाढीचा प्रस्ताव सध्या स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. मात्र, शंभर रुपयांच्या तिकीट दराला विरोध होत असल्यामुळे पेंग्विन पक्षी पाहण्यासाठी 50 रुपये तर राणीबागेसाठी 20 ते 25 रुपये एवढे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे अर्थात राणीबागेचे प्रवेश शुल्क व इतर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यमान 5 रुपये शुल्काच्या तुलनेत प्राणिसंग्रहालय आणि हॅम्बोल्ट पेंग्विन सुविधा आदीसाठी 12 वर्षांवरील सर्वांसाठी 100 रुपये तर 3 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी 25 रुपये असे प्रवेश शुल्क निश्चित केले आहे. परंतु आई-वडील आणि 12 वर्षांआतील दोन मुले सोबत असल्यास त्या कुटुंबाकडून सरसकटच 100 रुपये शुल्क घेतले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी याला विरोध दर्शवला आहे. त्यानंतर भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी या तिकीट दरवाढीला आपला विरोध असल्याचे जाहीर केले. जॉगिंगला येणाऱ्या लोकांचे पैसे वाढवण्याचा आपल्याला अधिकार काय? असा सवाल करत सकाळ आणि संध्याकाळ फिरायला येणाऱ्यांचे कोणतेही शुल्क वाढवले जाऊ नये, ही आमची प्रमुख भूमिका असल्याचं कोटक यांनी सांगितलं. राणीबाग पेंग्विन पाहण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्कही आपण कमी करू असे कोटक यांनी म्हटले आहे. हे शुल्क निश्चित कमी करण्याच्या बाजूने आम्ही राहणार असल्याचं सांगत बैठकीत जनतेच्या हिताचा निर्णय घेण्यास आम्ही सत्ताधारी पक्षाला मजबूर करू, असं विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटलं आहे. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सदस्यांच्या सूचनांचा विचार करून जनतेला अभिप्रेत असलेला निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पेंग्विन पाहण्यासाठी आणि राणीबागेत जाण्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्याची मागणी सदस्यांकडून केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पेंग्विन पक्षी पाहण्यासाठी 100 ऐवजी 50 रुपये तर पेंग्विन वगळता राणीबागेत फिरण्यासाठी केवळ 20 ते 25 रुपये एवढे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, कुटुंबासाठी अर्थात आई वडील आणि दोन मुलांसाठी 100 रुपयांचे शुल्क कायम ठेवले जाणार आहे. राणीबागेचा पूर्ण विकास न झाल्यामुळे टप्याटप्याने वाढ करण्याची सूचना मांडून 5 रुपयांच्या शुल्कात अजून 15 ते 20 रुपयांची वाढ करण्यास स्थायी समिती मंजुरी देईल, असंही बोललं जात आहे.

Loading Comments