रुग्णालयात प्रवेश पास नसेल तर फौजदारी गुन्हा!

  BMC
  रुग्णालयात प्रवेश पास नसेल तर फौजदारी गुन्हा!
  मुंबई  -  

  मुंबई - सायन रुग्णालयातील डॉक्टरला झालेल्या मारहाणीमुळे निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून, यासाठी तातडीने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रवेश पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना दोनपेक्षा अधिक पास दिले जाऊ नयेत असा निर्णय घेत ज्या व्यक्तीकडे प्रवेश पास नसेल त्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  महापालिकेच्या सर्व मोठ्या रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत सोमवारी संध्याकाळी एक उच्चस्तरीय बैठक महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात पार पडली. सायन येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, उपायुक्त सुनिल धामणे, उपायुक्त रमेश पवार, महापालिकेचे प्रमुख सुरक्षा अधिकारी दत्तात्रेय पाटील यांच्यासह सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या बैठकीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांसाठी वेगवेगळ्या रंगांचे प्रवेश पास असतील. रुग्णालय परिसरात असताना हे पास ठळकपणे दिसतील अशा पद्धतीने बाळगणे बंधनकारक असेल. महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज नियमितपणे तपासून विनापास व्यक्ती ज्या ठिकाणी दिसून येतील त्यांची ओळख पटवून, त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याचे निर्देश संबंधित रुग्णांलयांचे अधिष्ठाता आणि सुरक्षा अधिकारी यांना महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये प्रवेशासाठी असणारी सर्व ठिकाणे (Entry Points) तातडीने निश्चित करून त्या प्रवेशद्वारातूनच संबंधितांना येण्या-जाण्यास प्रवेश दिला जावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

  ‘महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स’चे सशस्त्र जवान

  सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ‘महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स’द्वारे आवश्यकतेनुसार सुरक्षा रक्षक उपलब्ध करुन घेण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच आवश्यक तेथे शस्त्रधारी सुरक्षा रक्षक देखील उपलब्ध करुन घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत. ‘महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स’च्या सुरक्षा रक्षकांना पोलिसांप्रमाणेच कारवाईचे आणि शस्त्र बाळगण्याचे अधिकार असतात. त्यामुळे या जवानांना तैनात करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, तत्पूर्वी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी ७०० पोलीस उपलब्ध असल्याचे जाहीरपणे सांगितले. परंतु हे पोलीस नसून, ‘महाराष्ट्र स्टेट सेक्युरिटी फोर्स’चे जवानच असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे अज्ञान पुन्हा एकदा उघड झाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.