Advertisement

राणीबागेतील संध्याकाळचा फेरफटका होणार बंद


राणीबागेतील संध्याकाळचा फेरफटका होणार बंद
SHARES

भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील पाहुण्या पेंग्विनच्या दर्शनासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका आता सकाळ आणि संध्याकाळी उद्यानात फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनाही होणार आहे. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना आता महिन्यापोटी दीडशे रुपये मोजावे लागणार आहे. शिवाय संध्याकाळच्या फेरफटक्यालाही बंदी घातली जाणार आहे. त्यामुळे भायखळ्यातील नागरिकांना संध्याकाळी फिरण्यासाठी नवीन उद्यानाचा शोध घ्यावा लागणार आहे.

महापालिकेने राणीबागेचे प्रवेश शुल्क व इतर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यमान 5 रुपये शुल्काच्या तुलनेत प्राणिसंग्रहालय आणि हम्बोल्ट पेंग्वीन
दर्शन आणि इतर सुविधेसाठी 12 वर्षांवरील पर्यटकांना 100 रुपये तर 3 ते 12 वर्षांमधील मुलांसाठी 25 रुपये असा प्रवेश शुल्क निश्चित करण्यात आला आहे. परंतु आईवडिल व 12 वर्षांआतील दोन मुले सोबत असल्यास त्या कुटुंबाकडून सरसकटच 100 रुपये शुल्क स्वीकारले जाणार आहे.

अशाप्रकारचा प्रवेश शुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या सभेनंतर बाजार व उद्यान समितीमध्ये मंजूर करण्यात आल्यानंतर आता स्थायी समितीपुढे मंजुरीला आहे. परंतु यामध्ये सकाळ आणि संध्याकाळ फेरफटका मारून पाय मोकळे करणाऱ्या नागरिकांना तसेच ज्येष्ठांना संध्याकाळचा प्रवेश बंद केला जाणार आहे.

उद्यानात सध्या सकाळी 6 ते 8 या वेळेत लोक फेरफटका मारतात. मासिक 30 रुपये आकारून त्यांना फेरफटका मारण्यास प्रवेश दिला जातो. आता त्यासाठी ज्येष्ठ नागरिक वगळता इतरांकडून मासिक 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, त्यांना केवळ सकाळी दोन तास फिरण्यास प्रवेश दिला जाणार असला तरी संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येणार असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

बैठकीत भाजपाच्या तोंडाला टाळे, बाहेर विरोध -
राणीबागेतील 100 रुपयांच्या प्रवेश शुल्क वाढीला भाजपाचा विरोध राहील, असे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले. भाजपाने हा विरोध दर्शवला असला तरी गटनेत्यांच्या सभेत भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि बाजार व उद्यान समितीच्या सभेत भाजपाच्या एकाही नगरसेवकाच्या याविरोधात आवाज उठवला नाही. बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही की कोणी विरोधही केला नाही, असे समिती अध्यक्षा सान्वी तांडेल यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले. त्यामुळे समितीच्या बैठकीत भाजपाच्या सदस्यांनी तोंड उघडायचे नाही आणि बाहेर विरोध दर्शवायचा ही भाजपाची दुटप्पी भूमिका असून स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजूर होऊ नये म्हणून भाजपा काय रणनिती आखते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा