Advertisement

अग्निशमन दलाची ‘एफबीएसएस’ प्रणाली १२ वर्षांपासून धुळखात पडून


अग्निशमन दलाची ‘एफबीएसएस’ प्रणाली १२ वर्षांपासून धुळखात पडून
SHARES

माहिती व तंत्रज्ञानाच्या या युगात मुंबई महापालिकेकडून संगणकीय कामकाजाला दुय्यम स्थान दिले जात आहे. मुंबई महापालिकेचे कामकाज सॅप प्रणालीला जोडून केले जात असले, तरी प्रत्यक्षात मुंबई अग्निशमन दलासाठी फायर ब्रिगेड सॉफ्टवेअर सिस्टीम (एफबीएसएस)ची कार्यप्रणाली विकसित केल्यानंतरही प्रत्यक्षात याचा वापरच केला जात नाहीये. एका क्लिकवर अग्निशमन दलाकडून केल्या जाणाऱ्या कामांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रणाली विकसित केली होती. परंतु, मागील दहा ते बारा वर्षांपासून ही प्रणाली धुळखात पडली आहे.

या प्रणालीची देखभाल करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची मदत उपलब्ध न झाल्याने लाखो रुपये खर्चूनही या सिस्टीमअभावी पुन्हा पुन्हा फायली चाळून कामकाजात वेळ घालवावा लागत आहे.


२००३मध्येच दिले होते कंत्राट

मुंबई अग्निशमन दलासाठी फायर ब्रिगेड सॉफ्टवेअर सिस्टीम (एफबीएसएस) ही कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी स्थायी समितीच्या मान्यतेने जानेवारी २००३मध्ये एस. टेलिव्हॉईस सर्विसेस (एटीएस) या कंपनीला सुमारे ४८ लाखांचे कंत्राट दिले होते. ही कार्यप्रणाली आठ महिन्यांमध्ये अर्थात ऑगस्ट २००३ पर्यंत चार टप्प्यांमध्ये तयार करायची होती. परंतु, संबंधित कंपनीने हे काम वेळेत न केल्यामुळे कंपनीवर दोन लाखांचा दंड आकारला. मात्र, या कंपनीने चौथ्या टप्प्यातील काम पूर्ण केल्यानंतर सन २००६मध्ये महापालिकेचे संगणकीकरण करण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टी.सी.एस) यांची नियुक्ती केली.



प्रणाली तयार असूनही वापर नाही!

या सल्लागार कंपनीने अग्निशमन दलासाठी बनवलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये बदल सुचवून पुनर्रचना करण्याची शिफारस केली. त्यामुळे पुन्हा एकदा याच कंपनीला ६४ लाखांचे कंत्राट दिले गेले. हे काम पूर्ण झाल्यानंतर याची चाचणी भायखळा येथील अग्निशमन नियंत्रण कक्षात घेण्यात आल्यानंतर ही सिस्टीम योग्य असल्याचे प्रमाणपत्र तत्कालीन प्रमुख अग्निशमन दल अधिकारी व टीसीएसच्या प्रकल्प संचालकांनी दिले. मात्र, ही सिस्टीम विकसित झाल्यानंतरही जुलै २००७पासून अग्निशमन दलाकडून याचा वापर केला जात नाहीये.


देखभाल यंत्रणा नसल्यामुळे प्रणाली धुळखात पडून

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या कंपनीला हे काम दिले होते, त्या कंपनीला महापलिकेने काळ्या यादीत टाकले आहे. मात्र, या सिस्टीमचा वापर करण्यात येणार असल्याने याची देखभाल करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मनुष्यबळ अथवा यंत्रणा पुरवली जावी, अशी मागणी अग्निशमन दलाकडून वारंवार करण्यात येत हाेती. परंतु, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ही यंत्रणा उपलब्ध न झाल्याने या प्रणालीचा वापर करण्यात येत नाहीये.


वापर करण्यास अग्निशम दल तयार

ही प्रणाली सध्या बंद आहे ही वस्तुस्थिती असली, तरी माहिती व तंत्रज्ञान विभागाने जर ही यंत्रणा उपलब्ध करून दिली, तर त्याचा वापर करण्यास अग्निशमन दल तयार आहे. अग्निशमन दलात कोणतीही तंत्रज्ञ व्यक्ती नसल्याने ही मागणी केली होती, अशी माहिती अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

दरम्यान, यावर महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांनी ताशेरे ओढले आहेत.

सन २०१२-१३चा वार्षिक लेखापरीक्षा अहवाल बनवेपर्यंत या प्रणालीचा वापरच करण्यात आला नाही.


सुरेश बनसोडे, मुख्य लेखापरीक्षक


कशासाठी हवीय ही प्रणाली?

मुंबईत सध्या अनेक टोलेजंग इमारतींचे बांधकाम होत आहेत. या इमारतींसह अनेक इमारतींचे फायर ऑडिट अग्निशमन दलाकडून करण्यात येते. त्यामुळे या ऑडिटची माहिती संगणकीय सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केल्यास कोणत्याही इमारतीचे ऑडिट केले आहे किंवा त्यांना ऑडिट करण्यास नोटीस बजावली किंबहुना कोणत्या इमारतींनी नोटीसनुसार सुधारणा केलेल्या नाहीत, याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. याशिवाय आगीच्या दुघर्टना आणि दलाच्या अन्य कामांची माहितीही एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी या प्रणालीचा वापर करण्यात येणार होता.



हेही वाचा

अग्निशमन दलाकडे ५ हजारांहून अधिक स्वयंसेवकांची फौज, तरीही आगी लागण्याच्या घटना


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा