Advertisement

‌मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई, ९ लाख लिटर दुधाची तपासणी

राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड आणि एलबीएस या ५ टोलनाक्यावरून मुंबईत येणारे दुधाचे २२७ टँकर 'एफडीए'ने अडवले. त्यातील तब्बल ९ लाख २७ हजार लीटर दुधाची तपासणी केल्यावर 'एफडीए'ला १९ हजार २५० लिटर भेसळयुक्त दूध आढळलं. त्यामुळे हे दूध त्वरित नष्ट करण्यात आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

‌मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई, ९ लाख लिटर दुधाची तपासणी
SHARES

अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या बृहन्मुंबई विभागाने विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी पहाटे मुंबईतील ५ एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड आणि एलबीएस या ५ टोलनाक्यावरून मुंबईत येणारे दुधाचे २२७ टँकर 'एफडीए'ने अडवले. त्यातील तब्बल ९ लाख २७ हजार लिटर दुधाची तपासणी केल्यावर 'एफडीए'ला १९ हजार २५० लिटर भेसळयुक्त दूध आढळलं. त्यामुळे हे दूध त्वरित नष्ट करण्यात आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त, बृहन्मुंबई (अन्न), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. 'एफडीए'ने एकाच वेळी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे.


सणासुदीला वाढतं प्रमाण

राज्यात सणासुदीच्या काळात दूध भेसळीचं प्रमाण अधिक वाढतं. असं दूध आरोग्यास हानीकारक असल्याने या दूध भेसळीला आळा घालण्यासाठी 'एफडीए'ने बुधवारी अचानक ५ टोल नाक्यांवर धाड टाकण्याचं ठरवलं. त्यानुसार पहाटे पाचही टोल नाके सील करत ३५ अन्न सुरक्षा अधिकारी आणि १२ सहाय्यक आयुक्ताच्या पथकाने २२७ टँकरची तपासणी केली.


दूध डेअरीत पाठवलं

यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तब्बल ९ लाख२२ हजार लिटर दुधाची तपासणी केली. तर दुधाचे १३ नमुने ताब्यात घेतले. यातील ५ नमुने किरकोळ आढळले. त्यामुळे पुणे आणि नाशिकवरून आलेलं हे ३ हजार ४४२ लिटर दूध परत डेअरीला 'रिप्रोसेसिंग'साठी पाठवण्यात आलं. या दुधाची किंमत १ लाख ९३० रुपये इतकी आहे.


घातक रसायने

तर ८ नमुन्यांमध्ये घातक रसायनं आढळली जी आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात. १९ हजार२५० लिटर आणि ५ लाख७१ हजार ३३० रुपये किंमतीच्या या दुधात माँयट्रोडेसिल आणि अमोनिया सल्फेट असे घातक घटक आढळले. त्यामुळे हे दूध त्वरीत वाशी महापालिकेच्या प्लांटवर नेत नष्ट करण्यात आल्याचंही आढाव यांनी सांगितलं.

तर याप्रकरणी पुढील कारवाई सुरू असून ही मोहीम अशीच सुरू राहील, असं एफडीएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र 'एफडीए'ने दूध भेसळखोरांना अचानक दणका दिल्याने अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा दावाही 'एफडीए'कडून केला जात आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा