Advertisement

भांडुप विषबाधा प्रकरण: अखेर 'त्या' कंत्राटदाराचं 'शटर डाऊन'

सह्याद्री शाळेनं ज्या लिंगेश्वर महिला मंडळाला जेवण बनवण्याचं कंत्राट दिलं होतं, त्या कंत्राटदाराकडे एफडीएचा परवानाच नव्हता. तर जिथं विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जात होतं, तिथं अत्यंत अस्वच्छता होती. एकूणच या कंत्राटदारानं अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन केल्यानं या कायद्यानुसार आता कंत्राटदाराविरोधातील कारवाईला एफडीएनं सुरूवात केली आहे.

भांडुप विषबाधा प्रकरण: अखेर 'त्या' कंत्राटदाराचं 'शटर डाऊन'
SHARES

भांडुपमधील सह्याद्री विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या विषबाधेप्रकरणी अन्नपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराला काम थांबवण्याची नोटीस देत, त्याचं स्वयंपाकघर बंद करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासनाने दिले आहेत.

परवाना न घेता अन्न शिजवणं आणि अन्नाशीसंबंधित व्यवसाय करणं हा अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराकडे अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)चा परवाना नसल्याची धक्कादायक माहिती एफडीेच्या चौकशीतून समोर आल्यावर या कंत्राटदाराला स्टाॅप बिझनेसची नोटीस देण्यात आली. तसंच त्याच्या स्वयंपाकघराचं शटर डाऊन करण्यात आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई), एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


कधी घडला विषबाधेचा प्रकार?

गुरूवारी सकाळी ११ वाजता सह्याद्री विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना वरणभात (डाळखिचडी) खाण्यास दिली. त्यानंतर अर्ध्या तासाने १६ विद्यार्थ्यांसह एका शिक्षिकेला उलटी, मळमळ आणि पोटदुखीसारखा त्रास होऊ लागल्यानं त्यांना त्वरीत रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत या सर्वांना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलं. त्यानुसार एफडीएनं शाळेसाठी अन्न बनवणाऱ्या कंत्राटदाराच्या स्वयंपाकघरावर धाड टाकल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.



अस्वच्छतेत स्वयंपाक

सह्याद्री शाळेनं ज्या लिंगेश्वर महिला मंडळाला जेवण बनवण्याचं कंत्राट दिलं होतं, त्या कंत्राटदाराकडे एफडीएचा परवानाच नव्हता. तर जिथं विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जात होतं, तिथं अत्यंत अस्वच्छता होती. एकूणच या कंत्राटदारानं अन्न सुरक्षा मानके कायद्याचं उल्लंघन केल्यानं या कायद्यानुसार आता कंत्राटदाराविरोधातील कारवाईला एफडीएनं सुरूवात केली आहे.


कडक कारवाईचा इशारा

परवाना नसल्यानं त्वरीत नोटीस बजावत त्यांचा व्यवसाय बंद करत स्वयंपाक घरही बंद केलं आहे. जोपर्यंत परवाना घेत नाही तोपर्यंत लिंगेश्वर महिला मंडळाला हे स्वयंपाकघर वा व्यवसाय पुन्हा सुरू करता येणार नाही, तसं केलं तर त्यांच्याविरोधात याहीपेक्षा कडक कारवाई होईल, असंही आढाव यांनी सांगितलं आहे.

दरम्यान अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून या नमुन्यांचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. हे नमुने असुरक्षित आढळले तर या कंत्राटदाराला आणखी कडक आणि मोठ्या कारवाईला समोरं जावं लागण्याची शक्यता आहे.



हेही वाचा-

Exclusive- भांडुप विषबाधा प्रकरण: विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणारा कंत्राटदार विनापरवाना!

भांडुपमधील खासगी शाळेतील १६ विद्यार्थ्यांना विषबाधा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा