Advertisement

खायचा बर्फ पांढरा, तर वापरायचा बर्फ असेल निळा!


खायचा बर्फ पांढरा, तर वापरायचा बर्फ असेल निळा!
SHARES

बर्फ म्हटला की पांढरा शुभ्र बर्फ डोळ्यासमोर उभा राहतो. यापुढे मात्र पांढरा आणि निळा अशा दोन रंगांचे बर्फ पाहायला मिळाले, तर आश्चर्यचकीत होऊ नका. हो...पण निळा बर्फ खाऊ नका...निळा बर्फ खाण्यासाठी नाही.  कारण यापुढे खाण्याच्या बर्फाचा रंग पांढरा असणार आहे तर व्यावसायिक वापराच्या अखाद्य बर्फाचा रंग निळा असणार आहे.

खाद्य आणि अखाद्य अशा दोन प्रकारांमध्ये बर्फाचा वापर केला जातो. मात्र या दोन्ही बर्फाचा रंग पांढराच आहे. त्यामुळे खाद्य बर्फ कोणता आणि अखाद्य बर्फ कोणता? यातील फरक कळत नाही आणि याचाच फायदा घेत अखाद्य, दूषित, शरीरास अपायकारक बर्फ खाण्यासाठी म्हणून कंपन्यांकडून, विक्रेत्यांकडून विकला जातो.

अशा दूषित, अखाद्य बर्फामध्ये ई-कोलायसारखे जिवाणू असतात. असा बर्फ खाल्ल्यास पोटदुखी, डायरिया, गॅस्ट्रो, काविळीसारखे आजार होतात. गेल्या पाच-सहा वर्षांत ई-कोलायुक्त बर्फ मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरील ज्यूस, सरबत आणि गोळा विक्रेत्यांकडून वापरला जात आहे. हा बर्फ खाद्य बर्फाच्या तुलनेत खूपच स्वस्त असल्याने विक्रेते अखाद्य बर्फ वापरत ग्राहकांच्या जिवाशी खेळत आहेत.

ई-कोलाय बर्फामुळे साथीचे रोग पसरत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर्षी उन्हाळ्यात मुंबई महानगरपालिकेसह अऩ्न आणि औषध प्रशासना(एफडीए)ने अशा विक्रेत्यांविरोधात कडक कारवाई केली. या कारवाईत लाखोंचा दूषित बर्फ जप्त करत नष्ट केला गेला. दरम्यान, हे चित्र लक्षात घेत एफडीएने दूषित, अखाद्य बर्फ खाण्यासाठी वापरला जाऊ नये, यासाठी काही उपाययोजना पुढे आणल्या आहेत. त्यातील एक उपाययोजना म्हणजे रंग बदलणे.


हा प्रस्ताव मंजूर झाला तर यापुढे खाण्याचा बर्फ हा पांढरा तर अखाद्य बर्फाचा रंग निळा असेल. त्यानुसार अखाद्य बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना असा बर्फ तयार करताना पर्यावरणपूरक अशा निळ्या रंगाचा वापर करणे बंधनकारक असेल. त्यांनी जर निळा रंग न वापरता अखाद्य बर्फ तयार केला आणि तो खाण्यासाठी विकला, वापरला, तर त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. तर निळा बर्फ विक्रीसाठी आला, तरीही संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. मात्र त्याचवेळी ग्राहकांना आता खाण्यासाठीचा बर्फ कोणता हे ओळखणे सोपे होईल, हे महत्त्वाचे.

चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त (अन्न), मुख्यालय, एफडीए


4 ऑक्टोबरला एफडीएत पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आणि एफडीएची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अखाद्य, व्यावसायिक वापरासाठीच्या बर्फाचा रंग निळा ठेवण्याचा ठराव करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर सांळुखे, सहआयुक्त (अन्न), मुख्यालय, एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. या ठरावानुसार, आता लवकरच यासंबंधी प्रस्ताव तयार करत हा प्रस्ताव वैदयकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.



हेही वाचा

आठवड्याभरात 13 हजार 400 कि‍लो दूषित बर्फ जप्त


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा