Advertisement

मुंबईत एफडीएला दूषित बर्फ दिसेना !


मुंबईत एफडीएला दूषित बर्फ दिसेना !
SHARES

दूषित, ई-कोलाय विषाणू असलेला बर्फ रस्त्या-रस्त्यांवर विकला जातो. त्यामुळे आता अन्न आणि औषध प्रशासनाने राज्यभर दूषित बर्फाविरोधात मोहीम राबवण्यास सुरूवात केली आहे. त्यानुसार शनिवार-रविवार या दोन दिवसांत फक्त ठाण्यातूनच 15 दूषित बर्फाचे नमुने घेत 10 हजार किलो बर्फ नष्ट केला असल्याची माहिती ठाण्याचे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ठाण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई होत असताना मुंबईतील एफडीए अधिकाऱ्यांना मात्र दूषित बर्फ दिसत नाही का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळेच एफडीएने आतापर्यंत फक्त बर्फाचे 5 नमुने ताब्यात घेतले असून नष्ट करण्यात आलेल्या बर्फाचा आकडा शून्य आहे.

हे देखील वाचा - मुंबईकरांनो ! फेरीवाल्यांकडील बर्फ खाल तर...


मासे स्टोरेज करण्यासाठी आणि शवागारात जो बर्फ वापरला जातो त्याच बर्फाचा वापर रस्त्यावर विकले जाणा-या सरबत, ज्यूस, इतर थंडपेय आणि खाद्यपदार्थांसाठी होत असून यासंबंधी अनेक तक्रारी एफडीएकडे याआधीही करण्यात आल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते आर पी वाय राव यांनी दिली आहे. या तक्रारीकडे एफडीए साफ दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दूषित बर्फाविरोधात ठाण्यात जोरदार कारवाई सुरू असताना मुंबईत मात्र कारवाईच होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत हा मुंबईकरांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा - बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून

ठाण्यात दूषित बर्फाविरोधात जोरदार कारवाई होत आहे. शनिवारी आणि सुट्टीच्या दिवशी रविवारीही एफडीए अधिकाऱ्यांनी ठाण्यातील 85 बर्फाच्या पेढ्यांवर छापे टाकले. या छाप्यात सुमारे 10 हजार किलो बर्फ जप्त करत नष्ट केला, तर 15 नमुने ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांचा अहवाल आल्यास संबंधितांवर खटले दाखल केले जातील अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.फुड सेफ्टी अॅण्ड स्टॅर्ण्डड अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएफएसएआय) ने स्टोरेजसाठी खाद्य बर्फच तयार केला जावा असे बर्फ कंपन्यांना ठणकावून सांगत, तसे आदेशही काढले आहेत. मात्र या आदेशांकडे काणाडोळा करत स्टोरेजसाठी स्वस्त बर्फ, अखाद्य बर्फ खाण्यासाठी वापरण्याचा गोरख धंदा राज्यभर जोरात सुरू आहे. दुसरीकडे यावर ज्या यंत्रणेने लक्ष ठेवायला हवे ती यंत्रणाच अकार्यक्षम असल्याचा आरोप राव यांनी केला आहे. मुंबई एफडीएने त्वरीत जागे व्हावे आणि बर्फ कंपन्यांसह रस्त्यावरील स्टॉलवर छापे टाकत बर्फ नष्ट करावा, कारवाई करावी अशी मागणीही राव यांनी केली आहे.

मुंबईतही कारवाई सुरू असून आतापर्यंत 5 नमुने घेत तपासणीसाठी पाठवले आहे. दूषित बर्फ दिसला तर नक्कीच नष्ट करू. आतापर्यंत असा बर्फ आढळलाच नाही
सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त (अन्न), एफडीए, मुंबई






Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा