Advertisement

अखेर 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्याने दिसला एफडीएला दूषित बर्फ !


अखेर 'मुंबई लाइव्ह'च्या दणक्याने दिसला एफडीएला दूषित बर्फ !
SHARES

गेल्या तीन दिवसांपासून मुंबई महापालिकेने ई-कोलाय विषाणू असलेल्या दूषित बर्फाविरोधात जोरदार मोहीम उघडलीय. दूषित बर्फ वापरणाऱ्या फेरीवाल्यांकडून हा बर्फ ताब्यात घेऊन पालिकेने आतापर्यंत हजारो किलो बर्फ नष्टही केलाय. एवढेच नव्हे, तर अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)च्या ठाणे विभागानेही कारवाईचा धडाका लावलाय. असे असताना 'एफडीए'च्या मुंबईतील अधिकाऱ्यांना मात्र दूषित बर्फ दिसत नव्हता. यासंबंधीचे सविस्तर वृत्त सोमवारी दुपारी 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या 'एफडीए'ने सोमवारी संध्याकाळपासून एका दिवसात 898 किलो दूषित बर्फ जप्त केल्याची माहिती सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलीय.

स्टोरेजसाठीचा दूषित बर्फ खाण्यासाठी वापरला जात असल्याचे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पाहणीतून सिद्ध झाले होते. याच दूषित बर्फामुळे गॅस्ट्रोचे रूग्णही वाढत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे 'एफडीए'ने बर्फ बनविणाऱ्या फॅक्टरीवर कारवाई करण्याची सूचना केली होती. परंतु या काळात 'एफडीए'ने बघ्याची भूमिका घेतल्याने पालिकेने आपल्या स्तरावर कारवाई सुरू करत एकट्या एम पूर्व विभागातून सुमारे 13 हजार किलो दूषित बर्फ आणि थंडपेय नष्ट केले. ठाण्यातही 'एफडीए'च्या अधिकाऱ्यांनी 10 हजार किलोहून अधिक दूषित बर्फ नष्ट केला. तोपर्यंत 'एफडीए'च्या मुंबई विभागाने बर्फाचे केवळ 5 नमुने घेण्यापलीकडे कुठलीही कारवाई केलेली नव्हती. एवढेच नव्हे, तर दूषित बर्फ दिसला तरच तो नष्ट करु, अशी बेजबाबदार प्रतिक्रियाही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याचा खरपूस समाचार घेत 'मुंबई लाइव्ह'ने 'मुंबई एफडीएला दूषित बर्फ दिसेना' या मथळ्याखाली वृत्त दिले होते.


हेही वाचा

मुंबईत एफडीएला दूषित बर्फ दिसेना !

बर्फाचा गोळा खाताय? ...तर जरा जपून


या वृत्तानंतर 'एफडीए'च्या उच्च पदस्थांनी सर्व अधिकाऱ्यांना तंबी दिल्यावर अखेर मुंबईतील एफडीए कामाला लागले. सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत एफडीएने एकूण 898 किलो दूषित बर्फ नष्ट केलाय. तर ठाणे एफडीएनेही सोमवारी दिवसभरात 6,600 किलो दूषित बर्फ नष्ट केलाय. एफडीएच्या ठाण्यातील कारवाईमुळे बर्फ विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले असून ग्राहकांनी रस्त्यावरील अन्नपदार्थांसह थंडपेयाचे सेवन करु नये असे आवाहन साळुंखे यांनी केलेय.

1000 किलोचा आकडा गाठण्यात अपयश :

पालिका आणि ठाणे एफडीएकडून एका दिवसात हजारो किलो बर्फ नष्ट करण्यात येत असला, तरी मुंबई एफडीएला अद्याप 1000 किलोचाही आकडा गाठता आलेला नाहीये. एका ट्रकमध्ये 15 टन म्हणजे 15 हजार किलो बर्फ असतो. मुंबईत दररोज शेकडो टन दूषित बर्फ वापरला जात असताना एफडीएला अख्ख्या मुंबईत दिवसभरात केवळ 898 टन दूषित बर्फ दिसतो हे पटणारे नाही. एफडीए बर्फाविरोधातील कारवाईबाबत उदासीन असल्याचेच यावरून सिद्ध होत आहे. पालिका आणि एफडीएच्या ठाणे विभागाची कारवाई पाहिल्यानंतर तरी मुंबईतील एफडीए अधिकाऱ्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल आणि ते कारवाईला वेग देतील, अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते आर.पी. वाय. राव यांनी व्यक्त केलीय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा