Advertisement

म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पोटात असुरक्षित अन्न? एफडीएची म्हाडाच्या उपहारगृहाला नोटीस

म्हाडा भवनातील उपहारगृहात अस्वच्छ जागेत अन्न पदार्थ बनवण्यात येत होते. अन्नपदार्थांवर माशा बसलेल्या असतात, मुंग्या फिरत असतात अशा तक्रारी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार करूनही उपहारगृहाचा कंत्राटदार त्याकडे कानाडोळा करत होता.

म्हाडा कर्मचाऱ्यांच्या पोटात असुरक्षित अन्न? एफडीएची म्हाडाच्या उपहारगृहाला नोटीस
SHARES

वांद्रयातील म्हाडा भवनातील उपहारगृह अन्न सुरक्षा नियम धाब्यावर बसवून म्हाडा कर्मचाऱ्यांना अस्वच्छ आणि असुरक्षित अन्न-अन्नपदार्थ देत असल्याची धक्कादायक बाब अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या तपासणीतून समोर आली आहे. त्यानुसार उपहारगृह चालवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शैलेश आढाव, सहआयुक्त (बृहन्मुंबई), अन्न, एफडीए यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


एफडीएच्या अधिकाऱ्यांनी उपहारगृहावर छापा टाकत उपहारगृहाची तपासणी केली असता तिथं अत्यंत अस्वच्छ जागेत अन्नपदार्थ तयार केले जात असल्याची बाब समोर आली. हेच अन्नपदार्थ म्हाडा कर्मचाऱ्यांना दिलं जात असल्यानं म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.



कुठे आहे उपहारगृह?

म्हाडा भवनात म्हाडासह राज्य महिला आयोग, महाराष्ट्र बँक, महिला आर्थिक विकास महामंडळ यासह अन्य काही सरकारी यंत्रणांची कार्यालयं आहेत. या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी म्हाडा भवनातील तळमजल्यावंर उपहारगृहाची सोय करून देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांबरोबरच म्हाडा आणि इतर कार्यालयात ये-जा करणारेही याच उपहारगृहात नाश्ता आणि जेवण करतात.



स्वच्छतेकडे दुर्लक्ष

असं असतानाही उपहारगृहात अस्वच्छ जागेत अन्न पदार्थ बनवण्यात येत होते. अन्नपदार्थांवर माशा बसलेल्या असतात, मुंग्या फिरत असतात अशा तक्रारी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार करूनही उपहारगृहाचा कंत्राटदार त्याकडे कानाडोळा करत होता.



उपहारगृहावर धाड

अखेर एफडीएच्या बृहन्मुंबई, अन्न विभागाला यासंबंधीची माहिती मिळाल्यावर त्यांनी १ आॅगस्टला एफडीएने उपहारगृहावर धाड टाकली. या धाडीत 'अन्न सुरक्षा मानके कायद्या'चं सर्रास उल्लंघन उपहारगृह कंत्राटदाराकडून केलं जात असल्याचं निदर्शनास आल्याचं आढाव यांनी सांगितलं.



काय आलं समोर?

अस्वच्छ जागेत अन्नपदार्थ शिजवण्यासह, अन्नपदार्थ उघड्यावर ठेवणे, अन्नपदार्थ तयार करण्यासाठीचा कच्चा माल योग्य नसणे यासारख्या अन्य बाबी समोर आल्या आहेत. एफडीएनं दही आणि बेसनचे दोन नमुने ताब्यात घेत ते तपासणीसाठी पाठवले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानुसार कंत्राटदाराविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही एफडीएनं स्पष्ट केलं.



१५ दिवसांची नोटीस

या तपासणीनंतर एफडीएनं ४ आॅगस्टला कंत्राटदाराला १५ दिवसांची नोटीस बजावली आहे. या नोटीशीत १५ दिवसांत आवश्यक त्या सुधारणा करण्यास सांगितलं आहे. १५ दिवसांत या सुधारणा केल्या नाही तर उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येईल, असंही या नोटीशीत बजावण्यात आलं आहे. त्यामुळं आता १५ दिवसांत या सुधारणा होतात की परवाना रद्द होतो हे येणाऱ्या काळातच समजेल.



हेही वाचा-

तुमच्या ताटातली 'कोंबडी' तुम्हाला पाडू शकते आजारी

'त्या' महिला कैद्यांना अन्नबाधा नाहीच!



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा