Advertisement

गंभीर! डेअरीमध्येच होतेय दूधभेसळ

राज्याच्या कानाकोपऱ्यातील ज्या दूध डेअरींमधून मुंबईत दूध येतं त्या डेअरींमध्येच दुधात भेसळ केली जात आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या गेल्या महिन्याभरातील कारवाईतून ही गंभीर बाब प्रकर्षानं पुढं आली आहे.

गंभीर! डेअरीमध्येच होतेय दूधभेसळ
SHARES

दररोज सकाळी-सकाळी आपल्या घरात येणाऱ्या दुधाच्या पिशवीतील दूध शुद्ध आणि ताजं असेल की नाही याची खात्री आजच्या घडीला नाही. कारण मुंबईतल्या झोपड्या-झोपड्यांमध्ये ब्रँडेड दुधाच्या पिशव्या फाडून त्यातील निम्म दूध काढून त्यात पाणी भरून आपल्यापर्यंत पोहोचवलं जातंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या गेल्या महिन्याभरातील कारवाईतून ही गंभीर बाब प्रकर्षानं पुढं आली आहे. त्यापुढे जात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे, ती म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यातील ज्या दूध डेअरींमधून मुंबईत दूध येतं त्या डेअरींमध्येच दुधात भेसळ केली जात आहे.


'एफडीए'समोर नवं आव्हान

बुधवारी मुंबईच्या ५ एण्ट्री पाॅईंटवर 'एफडीेए'च्या बृहन्मुंबई विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान सातारा, धुळे, पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील डेअरींमधून येणाऱ्या दुधात भेसळ केली जात असल्याची माहिती 'एफडीए'च्या आयुक्त डाॅ. पल्लवी दराडे यांनी दिली आहे. त्यामुळे आता डेअरींमध्ये होणारी दूधभेसळ रोखण्याचं नवं आव्हान 'एफडीए'समोर उभं ठाकलं आहे.


गुन्हा दाखल होणार

त्यानुसार आता सर्व जिल्ह्यातील डेअरींकडे मोर्चा वळवण्याचे, डेअरींवर कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहितीही दराडे यांनी दिली आहे. साताऱ्यातील एका डेअरीवर अशी कारवाई झाली असून या डेअरीविरोधात लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


टँकरमधून दूधभेसळ

दुधाच्या पिशव्या फाडून दूध भेसळ केली जातेच; पण त्याचवेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून टँकरद्वारे येणाऱ्या दुधामध्येही भेसळ होत असल्याची माहिती 'एफडीए'ला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी मुंबईतील ५ टोलनाक्यांवरील २२७ टँकरची तपासणी करत १९ हजार हून अधिक लिटर भेसळयुक्त दूध 'एफडीए'ने नष्ट केलं. या कारवाईत डेअरीमधूनच भेसळयुक्त दूध येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.


कारवाईच्या सूचना

त्यानुसार 'एफडीए' अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त दूध कोणकोणत्या डेअरीतून आलं याची माहिती घेण्यास सुरूवात केली असून या डेअरींविरोधातच गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं 'एफडीए'कडून सांगण्यात येत आहे. कारण बुधवारच्या कारवाईनुसार साताऱ्यातील पैठण तालुक्यातील 'हेरिटेज फूड लिमिटेड' या कंपनीतून भेसळयुक्त दूध आल्याचं लक्षात आलं. त्याबरोबर साताऱ्यातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.


रंगेहाथ पकडलं

या सुचनेनुसार या कंपनी (डेअरी) वर छापा टाकला असता तिथं दुधात भेसळ करण्यासाठी मेल्टोडेक्स्ट्रीनसारख्या घटकाचा वापर करताना काही जणांना 'एफडीए'ने रंगेहाथ पकडल्याचं डाॅ. दराडे यांनी सांगितलं आहे. यावेळी ८९८ लीटर दूध आणि १२ हजारा ९२४ किलो दुधाची भुकटी जप्त करत ती त्वरीत नष्ट करण्यात आली आहे. नष्ट करण्यात आलेल्या दुधाची किंमत ४२ हजार २०६ रुपये इतकी, तर दुधाच्या भुकटीची किंमत १७ लाख ४४ हजार ७४० इतकी आहे. एकूणच डेअरीमध्येच दुधात भेसळ होत असल्यानं आता राज्यभरातील डेअरींवरही करडी नजर ठेवली जाणार आहे.


शटर डाऊन करणार

बुधवारच्या कारवाईदरम्यान ज्या ज्या डेअरीतून भेसळयुक्त दूध आल्याचं सिद्ध झालं आहे, त्या त्या डेअरींविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. तर गुन्हा सिद्ध झाल्यास डेअरीचं शटर डाऊन करण्याची कारवाई देखील केली जाईल, असे संकेतही 'एफडीए'कडून मिळत आहेत. दरम्यान दुधातील भेसळीचं प्रमाण वाढत असल्याने ग्राहकांनी दूध खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी आणि काहीही संशयास्पद वाटलं तर त्वरीत 'एफडीए'शी संपर्क साधावा, असं आवाहनही डाॅ. दराडे यांनी केलं आहे.



हेही वाचा-

मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर दूध भेसळखोरांवर कारवाई, ९ लाख लिटर दुधाची तपासणी

मुंबईकरांनो सावधान! दुधभेसळखोरांचा सुळसुळाट; दुसऱ्या रॅकेटचा पर्दाफाश



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा