फराळ बनवताय? मग भेसळखोरांपासून सावध रहा


SHARE

दिवाळीसाठी चकली, करंजी, लाडू, चिवडा आणि मिठाई असा फराळ तयार करण्याची लगबग घरोघरी सुरू झाली अाहे. फराळाचं साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी बाजारात वाढू लागली आहे. पण ग्राहकांनो फराळाचं  साहित्य अर्थात किराणा माल खरेदी करताना जरा सावधान! कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत अन्न भेसळखोर सक्रिय झाले असून खवा-मावा, मिठाई, तेल, तूप, रवा, बेसन इ. अन्नपदार्थांत भेसळ होत आहे. गेल्या १५ दिवसांत अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)कडून यासंदर्भात ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली.

दिवाळीत घरोघरी चकली, करंजी, लाडू, चिवडा, शंकरपाळी, अनारसे असे एक ना अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यामुळे साहजिकच दिवाळीत फराळासाठी लागणाऱ्या साहित्याची अर्थात खवा-मावा, तेल, तूप, रवा, बेसनसह अन्य कच्च्या मालाची मागणी वाढते. या वाढत्या मागणीचा फायदा घेण्यासाठी भेसळखोर दरवर्षी दिवाळीदरम्यान सक्रिय होतात. 

भेसळ करत निकृष्ट पदार्थ बाजारात विक्रीस आणतात. अशा निकृष्ट पदार्थांपासून तयार केलेले अन्नपदार्थ शरिरास घातक ठरू शकतात. उलटी-जुलाब, पोटदुखीपासून अगदी कॅन्सरसारखे मोठे आजार भेसळयुक्त अन्नपदार्थांपासून होत असल्याचं वेळोवेळी पुढं आलं आहे. त्यामुळे दिवाळीत तयार फराळ असो वा फराळ तयार करण्यासाठीचं साहित्य असो, अशी खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.


एफडीए सज्ज

दिवाळीत भेसळखोरांना रोखण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून दिवाळीच्या १५ दिवसआधीपासूनच विशेष मोहीम मुंबईसह राज्यभर राबवली जाते. त्यानुसार यंदाही एफडीएकडून या विशेष मोहिमेस सुरूवात झाली आहे. मुंबईसह राज्यभर खवा-माव्याच्या दुकानांवर, गोदामांवर, मिठाईच्या दुकानांवर  आणि किराणा मालाच्या दुकानांवर एफडीएची करडी नजर असून आवश्यकतेप्रमाणे छापे टाकले जात असल्याची माहिती चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त (अन्न), मुख्यालय यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.
'अशी' झाली कारवाई :

 • १५ दिवसांत राज्यभर छापे
 • खव्याचे ८३ नमुने घेतले
 • १ हजार २०० किलो खवा जप्त
 • जप्त खव्याची किंमत १ लाख ६१ हजार रुपये
 • मिठाईचे ३३९ नमुने घेतले
 • ७ हजार ३९ किलो मिठाई जप्त
 • जप्त मिठाईची किंमत ७ लाख ७४ हजार रूपये
 • खाद्यतेलाचे ४०० नमुने घेतले
 • २२ हजार ५९ किलो खाद्यतेल जप्त
 • जप्त खाद्यतेलाची किंमत ४५ लाख २४ हजार २९५ रुपये
 • याशिवाय रवा, बेसन, डाळी इ. भेसळयुक्त पदार्थ जप्त  


जप्त करण्यात आलेल्या पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले. तयार फराळ वा फराळासाठीचे साहित्य विकत घेताना ग्राहकांनी काळजी घ्यावी आणि काहीही संशयास्पद वाटल्यास त्वरीत एफडीएशी संपर्क साधावा, असं आवाहनही त्यांनी केले आहे.


ग्राहकांनो ही काळजी घ्या...

 • परवाना-नोंदणीधारक विक्रेत्यांकडूनच मिठाई तसेच किराणा माल खरेदी करा
 • खरेदी केलेल्या मालाचे बिल घ्या
 • मिठाई खरेदी करताना ती ताजी आहे का? हे तपासून घ्या
 • खवा-मावा खरेदी करतानाही वास आणि रंग यावर लक्ष ठेवा
 • मिठाई, खवा, मावा आणि फराळ योग्य तापमानात, स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा
 • मिठाईचे सेवन २४ तासांत, तर बंगाली मिठाईचे सेवन खरेदी केल्यापासून ८ तासांत करा
 • चांदीच्या वर्खाच्या मिठाईंना भुलू नका 
 • खुले तेल, तूप वा डालडा खरेदी करू नकाडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय