Advertisement

आता मिठाई घेताना जरा जपूनच!


आता मिठाई घेताना जरा जपूनच!
SHARES

सामान्यपणे सणांच्या काळात खवा-मावा आणि मिठाईची मागणी वाढते. त्यानुसार आता सोमवारी रक्षाबंधन, त्यापाठोपाठ दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि मग दिवाळी असे सण ओळीत येणार नि खवा-मावा, मिठाईची मागणी आणखी वाढणार. पण या वाढत्या मागणीचाच फायदा घेत भेसळखोरही या काळात सक्रीय होतात. त्यामुळेच दरवर्षी खवा, मावा, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह इतर अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रमाणवाढते. म्हणूनच सणासुदीच्या काळात असे पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)कडून करण्यात आले आहे.

सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांमधील त्यातही खवा-मावा आणि मिठाईतील पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्यता असते. त्यामुळेच दरवर्षी ऑगस्ट ते 31 डिसेंबरदरम्यान एफडीएकडून उत्सव विशेष मोहीम राबवली जाते. त्यानुसार 1 ऑस्टपासून मुंबईसह राज्यभरात या विशेष मोहिमेला सुरूवात झाल्याची माहिती सहआयुक्त चंद्रशेखर साळुंखे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. 

खवा-मावा हा विशेषत शेजारच्या गुजरातसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईसह राज्यात आयात केला जातो. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या खवा-माव्यावर विशेष लक्ष एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून ठेवण्यात येणार आहे. तर मिठाई आणि दुधाच्या दुकानांवरही करडी नजर असणार आहे. मिठाई-दुधाच्या दुकांनांची, खवा-माव्याच्या गोदामांची तपासणी करत अन्न पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहेत. तर अन्नपदार्थांमध्ये काही संशयास्पद आढळ्यास तिथल्या तिथे असे अन्नपदार्थ नष्ट करत संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले आहे.

31 डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या मोहिमेंतर्गत दसऱ्यापासून बेसन, चनाडाळ, तेल, तूप आणि इतर अन्न पदार्थांवरही एफडीएकडून विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचेही एफडीएने स्पष्ट केले आहे. कारण दसरा दिवाळीत खवा-मावा मिठाईबरोबरच दिवाळीच्या फराळासाठीच्या अन्नपदार्थांमधील भेसळ वाढते.


काय काळजी घ्याल


  • अन्नपदार्थ नोंदणीकृत दुकानदारांकडून खरेदी करा
  • खरेदीचं पक्कं बिल घ्या
  • अन्नपदार्थ ताजे आहेत की नाहीत याची खात्री करा
  • मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थ 24 तासांच्या आत खा
  • बंगाली मिठाई 10 तासांच्या आत खा
  • अन्नपदार्थांच्या पाकिटावरील सूचना, उत्पादनांसंबंधीची माहिती आणि तारीख तपासून घ्या
  • अन्नपदार्थांबाबत थोडी जरी शंका आल्यास तात्काळ एफडीएशी संपर्क साधा


गणेशोत्सव मंडळांचीही बैठक

अन्नसुरक्षा कायद्यानुसार जिथे शिजवले जाते, वितरीत केले जाते आणि विकले जाते, तिथे अन्न सुरक्षेचे नियम पाळणे आणि त्यासंबंधी नोंदणी असणे बंधनकारक आहे. त्यामुळे प्रसाद वाटपासाठीही अन्न सुरक्षा कायदा लागू झाला आहे. एफडीएची नोंदणी असेल, तरच प्रसाद वाटप करता येत असल्याने गेल्या काही वर्षांपासून एफडीएकडून गणेशोत्सव मंडळाला नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. एक वर्ष किंवा पाच वर्षाच्या कालावधीसाठी ही नोंदणी करता येते. त्यानुसार अनेक मंडळांनी अशी नोंदणी केली असून मोठ्या संख्येने मंडळे नोंदणीसाठी आता पुढे येत असल्याचेही साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे. तर हा प्रश्न अत्यंत नाजूक असल्याने विना नोंदणी प्रसाद वाटप करणाऱ्या मंडळांविरोधात कारवाई करण्याचे पाऊल उचलले जात नाही. पण एफडीएची गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामध्ये मंडळांवर करडी नजर असते. अन्नविषबाधा होऊ नये इतकीच यामागे भूमिका असते, असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यभरातील गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेत त्यांच्यात जनजागृती करण्यास सुरूवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.हेही वाचा

मुंबईतील 17 हॉटेल्स अस्वच्छ, 'एफडीए'ने पाठवली नोटीस


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा