Advertisement

एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड


एसटी बसच्या चालकपदी महिलांची निवड
SHARES

महिला रिक्षा चालवतात, कार चालवतात, काही महिला मिनी स्कूलबसही चालवतात, पण मोठी अवजड बस चालवताना महिला सहसा दिसत नाहीत. मात्र आता हे चित्र बदलणार आहे. कारण, एसटी महामंडळानं बसचं स्टेअरींग आता महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात १६३ महिला चालक तथा वाहकांची निवड करण्यात आली आहे.

नियुक्ती पत्रं

या महिलांना पुणे येथे झालेल्या समारंभात माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देऊन त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. या महिला बसचालक तथा वाहकांना आता एसटी महामंडळामार्फत १ वर्षाचं अवजड वाहन चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर या महिला प्रत्यक्ष रस्त्यावर एसटीची बस चालविताना दिसणार आहेत.

महत्वाचं पाऊल

महिलांना एसटी बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन महामंडळाने सामाजिक आणि राष्ट्रीयदृष्ट्या महत्वाचं पाऊल टाकलं आहे. या महिला जेव्हा एसटीची बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणि धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असं माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला.

अवजड वाहनाचं प्रशिक्षण 

महिलांची बसचालक तथा वाहकपदी भरती करण्याच्या दृष्टीनं त्यांना अनुभव तसेच उंचीच्या अटीमध्ये काही सूट देण्यात आल्या होत्या. आदिवासी भागात २१ महिलांना आधी हलकं वाहन चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. या महिलांना आता अवजड वाहनाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या भरतीमध्ये एकूण ९३२ महिला उमेदवारांनी चालक तथा वाहक पदाकरीता अर्ज केला होता. त्यापैकी ७४३ महिला उमेदवार लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यातील १४२ महिले अंतिमत: प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्या आहेत.

विविध योजना

'एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध योजना समाजासाठी उपयुक्त आहेत. महिलांना एसटी चालकांचे प्रशिक्षण देऊन महामंडळानं त्यांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला आहे. हे पाऊल अत्यंत धाडसी असून ते यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एसटी महामंडळाचा हा उपक्रम देशासमोर नवा आदर्श निर्माण करेल’, असं प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं.

सकारात्मकता निर्माण

'एसटी महामंडळात सकारात्मकता निर्माण करण्याचं काम केलं आहे. सुरुवातीला महिला टॅक्सीचालकाची योजना राबविली. त्यानंतर महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षांचा प्रयोग यशस्वीपणे राबविला. महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं. एसटी महामंडळात १६३ महिला बस चालकांची नियुक्ती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याचा हा प्रयोग देशभरातील महिला-मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे’, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं.हेही वाचा -

'बविआ'चे आमदार विलास तरे यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्राचे आरोपी, मनसेची भाजपच्या नेत्यांविरोधात पोस्टरबाजीRead this story in English
संबंधित विषय