Advertisement

शिवडीत रंगला फ्लेमिंगो फेस्टिव्हल


शिवडीत रंगला फ्लेमिंगो फेस्टिव्हल
SHARES

सिमेंटच्या जंगलात आजही एक निसर्गरम्य ठिकाण जिवंत आहे. या ठिकाणाची ओळख कायम राहावी येथे वास्तव्यास येणाऱ्या गुलाबी रोहित पक्षाचे विश्व सामान्यांसमोर उलगडावे आणि संवर्धनाचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचावा या उद्देशाने शनिवारी फ्लेमिंगो फेस्टिव्हल 2017 चे आयोजन शिवडी जेट्टीवर करण्यात आले होते. या फेस्टिवलचे यंदाचे दहावे वर्ष असून हजारो गुलाबी सुंदर फ्लेमिंगो पहायला विविध स्तरावरील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या फेस्टिव्हलचे उद्घाटन चित्रपट निर्माता मनिष हरिप्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अधिकारी, बीएनएचएसचे संचालक डॉ. दीपक आपटे, स्वयंसेवक, शास्त्रज्ञ, सभासद, निसर्गप्रेमी उपस्थित होते.

'बीएनएचएस' आणि मॅनग्रुव्ह अॅण्ड मरिन बायोडायव्हर्सिटी फाउंडेशनच्या वतीने आणि मुंबई पोर्ट ट्रस्टच्या सहयोगाने या फ्लेमिंगो फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं.

यावेळी फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी हजारो पक्षीप्रेमींची शिवडी जेट्टीवर गर्दी लोटली होती. या 'वीकेण्ड'ला फ्लेमिंगोंचं दर्शन घेण्याची अनोखी संधी 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'ने (बीएनएचएस) तमाम मुंबईकरांना उपलब्ध करून दिली. जवळजवळ 20 हजार फ्लेमिंगो आणि इतर पक्षांसोबतच एक सचित्र प्रदर्शन, निसर्गविषयक आणि वन्यजीवांवर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन तसेच इतर साहित्य असलेले स्टॉल, लहान मुलांकरता विविध उपक्रमांचा समावेश या फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला. त्याचबरोबर दीपक दलाल यांच्या 'फ्लेमिंगो इन माय गार्डन' या पुस्तकाचे वाचन यावेळी करण्यात आले.

मुंबईतील शिवडी माहुल चिखल पट्ट्यातील परिसर असल्याने त्याला पक्षी आणि जैवविविधता क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. पश्चिम भारतातील पाणथळ जागी राहणाऱ्या पक्षांचे सर्वात मोठे एकत्रीकरण या क्षेत्रात आढळते. येथे वाढणारी हरित शेवाळे आणि इतर पाणकृमी पक्ष्यांसाठी प्रमुख खाद्य ठरतात. त्यामुळे अनेक स्थलांतरित पक्षी येथे येतात. शिवडी येथील खाडी खारफुटी चिखलपट्टा हा सयुंक्त अधिवास मत्स्य व्यवसाय आणि सागरी लाटांपासून संरक्षण या दोन्ही गोष्टींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे बीएनएचएस संचालक डॉ. दीपक आपटे यांनी सांगितले.

उन्हाचा पारा चढलेला असतानाही यंदा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो फेस्टिव्हला भेट दिली. मोठ्यांपासून ते विविध शाळा कोलेजच्या विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली. येथे विविध प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. नागरिकांना जागृत करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

- बिलवदा काळे, जनसंपर्क अधिकारी, बीएनएचएस 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा