Advertisement

मुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) सह हेरिटेज वास्तू, टेक्सटाइल मिल म्युझियम, मणी भवन, बाणगंगा, माहीम किल्ला, महालक्ष्मी मंदिर, मरिन ड्राइव्ह, वरळी, माहीम चौपाटी, संजय गांधी उद्यान आदींचं आता सुशोभिकरण होणार आहे.

मुंबईच्या सुशोभीकरणासाठी ३२० कोटींची तरतूद
SHARES

मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) सह हेरिटेज वास्तू, टेक्सटाइल मिल म्युझियम, मणी भवन, बाणगंगा, माहीम किल्ला, महालक्ष्मी मंदिर, मरिन ड्राइव्ह, वरळी, माहीम चौपाटी, संजय गांधी उद्यान आदींचं आता सुशोभिकरण होणार आहे. यासाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात ३२० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे.  अर्थमंत्री अजित पवार यांनी  अर्थसंकल्पासाठी प्रत्येक खात्याच्या आढावा बैठका सुरू केल्या आहेत. यात मुंबईच्या विकासाबाबतची बैठकही दोन दिवसांपूर्वी झाली. बैठकीत मुंबईच्या पर्यटन विकासाचा आराखडा त्यांच्यापुढे मांडण्यात आला. ३२० कोटींच्या या आराखड्याला अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. 


महाविकास आघाडी सरकारने मुंबईचे वैभव असलेल्या वास्तू, मंदिर, हाजी अली दर्गा, जुने किल्ले, चौपाट्या यांच्या सुशोभिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील पर्यटन विकासाला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईतील हेरिटेज वास्तूंच्या सुशोभिकरणासाठी १०० कोटी,  गेट वे ऑफ इंडियासाठी ३५ कोटी,  बॅलार्ड इस्टेट कोर्टच्या सुशोभिकरणासाठी ४० कोटी, फोर्ट विभागातील काही रस्ते आकर्षक बनविण्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दक्षिण मध्य मुंबईत मुंबई महापालिका टेक्स्टाइल्स मिल म्युझियम बनविणार असून त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मनीभवन गांधी संग्रहालयासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आझाद मैदानासाठी राज्य सरकार आणि महापालिका हे संयुक्तरित्या २० कोटी रुपये खर्च करणार आहेत. लोवर ग्रो पम्पिंग स्टेशनसाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 


बाणगंगा तलावालगतचे अतिक्रमण हटविण्यासाठी दहा कोटी,  खोताची वाडी, वांद्रे आणि म्हातारपाकडी या भागाच्या विकासासाठी प्रत्येकी दहा कोटी, मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरांलगतच्या विकासासाठी दहा कोटी, मरिन ड्राइव्ह, वरळी आणि माहीम चौपाट्यांच्या सुशोभिकरणासाठी अनुक्रमे ५० कोटी, ३० कोटी आणि २० कोटी,  संजय गांधी उद्यान आणि कान्हेरी गुंफा यांच्या विकासासाठी २० कोटींची तरतूद केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील कॅम्पसच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचबरोबर मुंबईतील महत्त्वाच्या इमारतींच्या सुशोभिकरणासाठीही तरतूद करण्यात आली आहे.हेही वाचा-

वर्सोवा-विरार सागरी सेतूला एमएसआरडीसीची मान्यता

कोस्टल रोडसाठी ६०० झाडांचा बळी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा