Advertisement

पालिकेकडून २४४ ठिकाणी 'कोविड'ची मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा

दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान सदर २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे.

पालिकेकडून २४४ ठिकाणी 'कोविड'ची मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा
SHARES

मुंबईत कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर २४४ ठिकाणी कोविडची मोफत चाचणी करणार आहे. २ नोव्हेंबर पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विविध दवाखाने, रुग्णालये इत्यादी ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचण्यांची सुविधा करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे महापालिका क्षेत्रात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची सुविधा ३०० पेक्षा अधिक ठिकाणी उपलब्ध झाली असून ज्यामुळे मुंबईकरांना कोविड चाचणी अधिक सुलभतेने करण्याचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

हेही वाचाः- ९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय

पालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये २४४ ठिकाणी कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या २४४ ठिकाणांच्या पत्त्यांची यादी विभागनिहाय नियंत्रण कक्षांद्वारे आणि महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या '१९१६' या क्रमांकाद्वारेही उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे http://stopcoronavirus.mcgm.gov.in या स्वतंत्रपणे सुरू करण्यात आलेल्या समर्पित संकेतस्थळावर देखील ही माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य रुग्ण महापालिकेच्या ज्या विभागात रहात असेल, त्याच्या घराजवळ असणाऱ्या ठिकाणांची माहिती, ही विभागीय नियंत्रण कक्षांच्या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा '१९१६' या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर उपलब्ध होणार आहे. तसेच यासाठी संकेतस्थळाचा पर्याय देखील उपलब्ध आहे. यामुळे मुंबईकरांना आपल्या घरालगतच्या परिसरात कोविड विषयक वैद्यकीय चाचणी आता अधिक सुलभतेने व मोफत करवून घेता येणे शक्य होणार आहे.

हेही वाचाः- क्रेडिट कार्डवर द्यावे लागतात हे ७ शुल्क, बँका अनेकदा लपवतात माहिती

सध्या सुरुवातीला दररोज सकाळी १० ते १२ या कालावधीदरम्यान सदर २४४ ठिकाणी मोफत वैद्यकीय चाचणी सुविधा 'वॉक इन' पद्धतीने उपलब्ध असणार आहे. यापैकी काही ठिकाणी आर.टी.पी.सी.आर. पद्धतीची वैद्यकीय चाचणी; तर उर्वरित ठिकाणी अॅंटीजन (Antigen) आधारित वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणार आहे. वरीलनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील २४४ ठिकाणांव्यतिरिक्त व्यतिरिक्त, महापालिका क्षेत्रातील ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमध्येही या आधीपासूनच कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा सशुल्क स्वरूपात उपलब्ध आहे. यासाठी सुधारित शासकीय दरांनुसार घरी येऊन वैद्यकीय चाचणी करण्यासाठी रुपये १,८००/-; तर वैद्यकीय प्रयोगशाळेत जाऊन चाचणी करवून घेण्यासाठी रुपये १,४००/- एवढे शुल्क आहे.

हेही वाचाः- ठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन

पालिकेने दिलेल्या माहितीनुसा २४४ ठिकाणे, ५४ खासगी वैद्यकीय प्रयोगशाळा, या व्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्येही कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध आहे. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड विषयक वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध असणाऱ्या ठिकाणांची एकूण संख्या ही ३०० पेक्षा अधिक झाली असून मुंबईकरांना कोविड विषयक वैद्यकीय चाचण्या करण्याचे अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. ज्यामुळे चाचण्यांची संख्या वाढण्यास मदत होण्यासोबतच वेळेत निदान होण्यासही मदत होणार आहे. परिणामी अधिक प्रभावीपणे कोविड संसर्गाला प्रतिबंध करणेही शक्य होणार आहे, अशी माहिती या निमित्ताने अतिरिक्त महापालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा