शहरातील कचरा विल्हेवाटीवर दिवसाला 2 लाखांचा खर्च

  Mumbai
  शहरातील कचरा विल्हेवाटीवर दिवसाला 2 लाखांचा खर्च
  मुंबई  -  

  मुंबई शहरातील अर्थात कुलाबा ते माहिम, धारावी, शीवपर्यंत जमा होणारा कचरा डंम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकण्यासाठी सुमारे दोन लाख रुपये खर्च केले जात आहेत. शहरातील सर्व भागातील कचरा महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर एकत्र जमा केला जातो. दरदिवशी सरासरी 650 मेट्रीक टन कचरा याठिकाणी जमा होत असून, हा जमा करण्यात आलेला कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडपर्यंत वाहून नेण्यासाठी प्रत्येक दिवशी सरासरी दोन लाख रुपये खर्च येत असल्याची बाब समोर आली आहे.

  मुंबईत दरदिवशी सुमारे साडेआठ ते नऊ हजार मेट्रीक टन कचरा गोळा होतो. मात्र, यातील 650 मेट्रीक टन कचरा हा निव्वळ शहर भागातील आहे. मुंबईतील कुलाबा,नरिमन पॉईंटपासून ते माहिम,धारावी,शीव आदी भागांमधील शहर परिसरात दरदिवशी निर्माण होणारा कचरा थेट डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन टाकणे शक्य नसल्यामुळे हा कचरा महालक्ष्मी येथील कचरा हस्तांतरण केंद्रावर जमा केला जातो. तिथून खासगी कंत्राटदारामार्फत तो कचरा बंदिस्त गाड्यांमधून डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. महालक्ष्मी येथील सन 2007 मध्ये याठिकाणी हायड्रोलिक ऑपरेटेड मेकॅनाईज्ड कचरा हस्तांतरण केंद्राची उभारणी बांधा, मालकी व वापर या तत्त्वावर करण्यात आली होती. दहा वर्षांकरता हे केंद्र होते. त्याचा कंत्राट कालावधी येत्या 8 मे 2017 रोजी संपुष्ठात येत आहे. त्यामुळे या कचरा केंद्रावर संबंधित कंपनीची मालकी राहणार असल्यामुळे महापालिकेने याठिकाणी नव्याने हायड्रेलिक ऑपरेटेड मेकॅनाईज्ड कचरा हस्तांतरण केंद्र हे सात वर्षांकरता बसवण्याचा निर्णय घेतला. परंतु अद्यापही हे केंद्र बनवण्यात आलेले नाही. महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तसेच कंत्राटदारांना मदत करण्याच्या धोरणामुळे नवीन कचरा हस्तांतरण बनवण्यात विलंब झालेला आहे. त्यामुळे 8 मे रोजी मुदत संपत असल्यामुळे पुढील एक वर्षासाठी याठिकाणाहून कचरा उचलून वाहून नेणे आणि डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यासाठी खासगी कंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षभरासाठी सुमारे 7 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी ग्लोबल वेस्ट मॅनेजमेंट सेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.