चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सरकारनं दारूबंदी उटवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूरमध्ये होत असलेली अवैध दारुविक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेत अससल्याचं सांगण्यात येतंय.
चंद्रपूरमधील दारुबंदीच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आणि वाद सुरू होते. सामाजिक कार्यकर्त्यांनी दारुबंदी उठवण्यास विरोध केला होता. मात्र चंद्रपूरमध्ये दारुबंदीमुळं अवैध दारूच्या विक्रीमध्ये वाढ, बनावट दारूची विक्री, त्यामुळं होणारे नागरिकांचे मृत्यू, दारुबंदीच्या काळात गुन्हेगारीची वाढ, दारुची तस्करी आणि त्यात तरुणांचा समावेश अशी अनेक कारणं देत नेत्यांकडून दारुबंदी उठवण्याची मागणी करण्यात येत होती.
काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दारुबंदी उठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर अखेर मंत्रिमंडळानं आता दारुबंदी उठवल्याची माहिती मिळाली आहे.
चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यानी विरोध केला आहे. हा निर्णय अत्यंत अयोग्य आहे. चंद्रपुर जिल्हयातल्या सहा लाख महिलांच्या जीवनावर हा परिणाम करणारा निर्णय असल्याची प्रतिक्रिया डॉ. अभय बंग यांनी दिली आहे.
दारुबंदीनंतर सरकारचा ३४५ कोटी रुपयांचा महसूल बुडत होता. जिल्हयात ५०० पेक्षा जास्त परवाना असलेली दुकानं होती. ३२० वाईन बार, ११० देशी दारुची दुकानं, २४ वाईन शॉप, ५० बियर शॉपी तर ८ ताडीची दुकानं होती. जिल्ह्यात रोज पाच कोटींची दारू विकली जात होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं एक एप्रिल २०१५ रोजी दारुबंदी जाहीर केली होती. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा दारुबंदी उठवण्याच्या हालचाली झाल्या. त्यानंतर दारुबंदीबाबत अभ्यास करण्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर अखेर दारुबंदी उठवण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा