वडाच्या तुटलेल्या फांद्यांना जीवनदान, 'ग्रीन अंब्रेला'चा अनोखा उपक्रम

Vikhroli, Mumbai  -  

वटपौर्णिमेच्या दिवशी सत्यवानाचे यमाकडून प्राण परत आणणाऱ्या सावित्रीची आख्यायिका सांगितली जाते. मात्र 21 व्या शतकात याच वटपौर्णिमेच्या दिवशी तोडलेल्या वडाच्या फांद्यांना पुन्हा जीवनदान देण्याचे काम विक्रोळीतील 'ग्रीन अंब्रेला' ही संस्था करत आहे.

वट पौर्णिमेच्या दिवशी तोडलेल्या वडाच्या फांद्या पुनर्जिवीत करण्याचे महत्त्वपूर्ण काम 'ग्रीन अंब्रेला' या सामाजिक संस्थेने हाती घेतले आहे आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. पूजा करून कचऱ्यात किंवा रस्त्यावर फेकलेल्या फांद्यांना जमा करून 'ग्रीन अंब्रेला'च्या विक्रोळीतील नर्सरीमध्ये त्यावर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्या पुनर्रोपित केल्या जातात. साधारणत: महिनाभर कुंड्यांमध्ये लावलेल्या या फांद्यांना पुन्हा मुळे फुटतील आणि त्या फांद्या पुनर्जिवीत होतील, अशी माहिती संस्थेचे सदस्य विक्रम इदे यांनी 'मुंबई लाइव्हला' दिली.विशेष म्हणजे या पुनर्जिवीत झालेल्या फांद्या पुन्हा महामार्गाच्या शेजारी लावल्या जातील, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, असेही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले. त्यांच्या या मोहीमेला गृहिणींचा देखील पाठिंबा मिळत आहे.

हल्ली बिझी लाईफमध्ये सण उत्सवात देखील शॉर्टकट मारण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. यात वटपौर्णिमा देखील सुटली नाही. वडाच्या झाडाजवळ पूजेसाठी न जाता शहरात सर्रासपणे वडाच्या झाडांची कत्तल करून त्याच्या फांद्या बाजारात विकण्यासाठी आणल्या जातात. पूजाअर्चा झाल्यावर त्या फांद्या रस्त्यावर किंवा कचऱ्यात फेकल्या जातात. अशा फांद्या एकत्र करून आम्ही त्या पुनर्रोपित करतो.

तुषार देसाई, सदस्य, ग्रीन अंब्रेला

Loading Comments