मुंबईचा पारा आणखी वाढणार!

 Mumbai
मुंबईचा पारा आणखी वाढणार!
Mumbai  -  

मुंबईचा पारा येत्या 2 ते 3 दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्याभरापासून सूर्य अधूनमधून चांगलाच तापत असल्याचं वारंवार हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय. पण, पुढच्या दोन दिवसांत पारा सरासरीपेक्षा आणखी 1 ते 2 अंशांनी वाढणार आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस जवळपास 41 अंशांपर्यंत मुंबईचं तापमान जाण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईचं तापमान 35 अंश सेल्सिअस एवढं होतं.

‘येत्या 48 तासांपेक्षा जास्त वेळेसाठी उष्ण लहर असण्याची शक्यता आहे. गुजरातच्या उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमान वाढणार आहे. त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात मुंबईतील तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे.’

तसंच दोन दिवस या कडक उन्हापासून वाचण्यासाठी महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. घरात कूलर, एसी किंवा पाणी मारून ओलावा निर्माण करा असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. घराबाहेर पडणार असाल तर शरीराला संपूर्ण झाका. तसंच उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या असाही सल्ला देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात शरीरासाठी हे घ्या -

  1. थंडगार पाण्यात मीठ, साखर घालून लिंबाचं सरबत प्या. त्यामुळे तहान भागतेच आणि पित्ताचा त्रासही होत नाही.
  2. उसाचा ताजा रस हा उन्हात अतिशय गुणकारी असतो. उसाच्या रसात भरपूर फळशर्करा असल्याने तो पौष्टिक आहे.
  3. कोकममुळे अंगात शीतलता वाढून उन्हाचा दाह कमी होतो. पित्ताच्या विकारावरही कोकम अतिशय गुणकारी आहे.
  4. पोटाला आणि शरीराला थंड वाटावं म्हणून उन्हात रोज ताक प्यावं. कैरीचं पन्ह घ्यावं.
  5. थंड बदामाचं दूध हे उन्हात एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पेय आहे. बदाम आपल्या शरीराला आणि बुद्धीला खूप फायद्याचे असते.
  6. उन्हाळ्यात जलजीरा प्यायल्याने शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहण्यास मदत होते.
Loading Comments