दिवाळीला महागाईचा तडका, सर्वसामान्यांचं दिवाळं निघणार

दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या डाळी, रवा, मैदा, कपडे, पणत्या आकाशकंदील यांसह सर्वच गोष्टी १५ ते २० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. यामुळे यंदाच्या दिवाळीत महागाईमुळे सर्वसामान्यांचे पुरते दिवाळं निघण्याची शक्यता आहे.

SHARE

दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. परंतु, यंदा दिवाळीला महागाईचा तडका लागण्याची शक्यता आहे. कारण दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या डाळी, रवा, मैदा, कपडे, पणत्या आकाशकंदील यांसह सर्वच गोष्टी १५ ते २० टक्क्यांनी महाग झाल्या आहेत. यामुळे यंदाच्या दिवाळीत महागाईमुळे सर्वसामान्यांचे पुरते दिवाळं निघण्याची शक्यता आहे. त्यातच महिन्याच्या सुरुवातीला दिवाळी येत असल्यानं महागाईमुळे दिवाळी सण साजरा करायचा कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.


कंदीलाच्या किंमतीही वाढल्या

प्लॅस्टिकबंदीमुळे बाजारात सगळीकडे कागद आणि कापडापासून बनवण्यात आलेले कंदील बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्यात ग्राहकही इको फ्रेंडली कंदीलांची मागणी करत असून त्यासोबतच पारंपरिक आकाशकंदीलांकडे ग्राहकांचा चांगलाच ओढा दिसत आहे. या कंदीलांच्या किमतीही वाढल्या असून ४०० रुपयांपासून ते १५०० रुपयांपर्यंतचे कंदील बाजारात उपलब्ध झाले आहेत.


तेल, डालडा महागला

दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आणि डालडा. दरम्यान यंदा घाऊक बाजारात साखर आणि डाळींच्या तुलनेत तेल आणि डालड्याला सर्वाधिक फटका बसला असून गेल्यावर्षी ९० रुपयांवर असणाऱ्या डालड़्यानं यंदा ११० रुपयांपर्यंत मजल मारली आहे. तर खाद्यतेलाच्या किमतीही प्रतिलिटर १५ ते २० रुपयांंनी महाग झाल्या असून १ लीटरच्या सनफ्लॉवर तेलासाठी १४० रुपये मोजावे लागत आहे. गेल्यावर्षी याच तेलाची किंमत ११० रुपये प्रतिलीटर होती.


रेडिमेड फराळही महाग

तेल आणि डालड्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहक रेडिमेड फराळ विकत घेतात. मात्र रेडिमेड फराळाच्या किमतीही यंदा २० ते ३० रुपयांनी वाढल्या आहे. या रेडिमेड फराळातील चकली ४०० रुपये किलो, चिवडा, शेव, शंकरपाळी ३०० रुपये किलो दरानं बाजारात विकल्या जात आहे. त्याशिवाय डाएट चिवड्याच्या २०० ग्रॅमच्या पॅकसाठी ५० रुपये मोजावं लागत असून रवा, बेसन लाडू आणि करंजीच्या एका नगासाठी २२ ते २५ रुपये मोजावे लागत आहेत.


किराणा मालाचे दर

 • साखर - ४० रुपये (प्रतिकिलो)
 • चणाडाळ- ७६ रुपये (प्रतिकिलो)
 • जाडी चणाडाळ- ८० रुपये (प्रतिकिलो)
 • जाड रवा - ३६ रुपये (प्रतिकिलो)
 • बारीक रवा - ३६ रुपये (प्रतिकिलो)
 • पिठीसाखर ४८ रुपये (प्रतिकिलो)
 • मैदा - ३६ रुपये (प्रतिकिलो)
 • पातळ पोहे - ६४ रुपये (प्रतिकिलो)
 • जाड पोहे - ६० रुपये (प्रतिकिलो)
 • बदाम – ८८० रुपये (प्रतिकिलो)
 • काजू १०८० रुपये (प्रतिकिलो)

सध्या पेट्रोलपासून घरगुती गॅसपर्यंत सर्व वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. किराणा मालापासून ते कंदीलापर्यंत प्रत्येक गोष्टीत जवळपास २० टक्क्यांनी दरवाढ झाली असून डाळी आणि तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी आणि महागाई टाळण्यासाठी आम्ही दिवाळीच्या खरेदीला काही दिवसांपूर्वीच सुरुवात करतो. तरीही अनेकदा खर्च करताना हात थोडा आखडताच घ्यावा लागतो.
- अविनाश खैरे, ग्राहक


हेही वाचा - 

इंधन दरवाढीनंतर कांदाही रडवणार! १० रुपयांनी झाला महाग

सीएनजीच्या दरात वाढ, रिक्षा-टॅक्सीचं भाडे वाढवण्याची मागणी

संबंधित विषय
ताज्या बातम्या