Advertisement

ताजमहल नव्हे, धारावी देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ


ताजमहल नव्हे, धारावी देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ
SHARES

तब्बल ५०० एकरहून जास्त क्षेत्रफळावर पसरलेली धारावी आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते. हीच झोपडपट्टी सध्या भारतातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून उदयास आली आहे. जगभरातील पर्यटक इथल्या लोकांचं राहणीमान बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी येतात. धारावीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या इतकी वाढलीय की पर्यटनाच्या बाबतीत धारावीने आता आग्र्यातील प्रसिद्ध ताज महाललाही मागे टाकलंय. एवढंच नाही, तर धारावीने आशियातील टाॅप १० पर्यटनस्थळांच्या यादीतही स्थान पटकावलंय.  

ट्रीप अॅडव्हाझर या वेबसाईटने सर्वेक्षणाच्या माध्यमातून जगातील तसंच आशिया खंडातील टाॅप १० प्रेक्षणीय स्थळांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत केवळ धारावी झोपडपट्टीचाच समावेश आहे. 


राहणीमानाचा अभ्यास

तसं बघायला गेल्यास भारतात हजारो पर्यटन स्थळं आहेत. या पर्यटनस्थळांना भेट द्यायला दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक भारतात येतात. गोवा, केरळ-कन्याकुमारी, ताजमहाल, खजुराहो, जम्मू आणि काश्मीर अशा लोकप्रिय स्थळांचा यांत समावेश आहे. परंतु या स्थळांसोबतच सध्या स्लम टुरिझम लोकप्रिय होत आहे. याअंतर्गत परदेशी पर्यटक मुंबईतील धारावी झोपडपट्टीला भेट देत आहेत. या भेटीत ते गलिच्छ वातावरणात लोकं जनावरांसारखे कसे राहतात? हे बघत आहेत. 


सिनेक्षेत्रालाही आकर्षण

धारावीची ही महती अख्ख्या जगभरात पसरली आहे. बाॅलिवूडपासून हाॅलिवूडपर्यंत सर्वांनाच या दाट झोपडपट्टीने आकर्षित केलं आहे. काही वर्षांपूर्वी ‘स्लम डाॅग मिलेनिअर’ या हाॅलिवूडच्या सिनेमाचं इथं शूटिंग झालं होतं. या सिनेमाला आॅस्कर पुरस्कारही मिळाला होता. बाॅलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहीत शेट्टी यांनी एकदा एका टीव्ही शो मध्ये सांगितलं होतं की, ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा, त्यांना धारावीतील स्लम टुरिझमबद्दल आवर्जून विचारलं जातं. तेव्हा त्यांना याचं खूप वाईट वाटतं. 

पर्यटकांची पसंती

‘टॉप १० ट्रव्हलर्स चॉइस एक्सपिरियन्स २०१९- वर्ल्ड अॅण्ड एशिया’ या सर्वेक्षणात पर्यटकांना भारतात फिरताना कोणत्या गोष्टी पाहायला आणि अनुभवायला आवडतात असे प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा पर्यटकांनी धारावीला पसंती दिली. धारावी या यादीत दहाव्या क्रमांकावर असून धारावीनंतर यादीत जुन्या दिल्लीचा क्रमांक लागतो. त्याखालोखाल ताजमहाल आणि आग्य्राच्या किल्ल्याचा क्रमांक लागतो.


काय आहे धारावी?

मुंबईतील माहीम स्टेशनाजवळ १.७५ चौरस किलोमीटर परिसरात धारावी वसलेलं आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार धारावीत किमान १ लाखांहून अधिक लाेकं राहतात. धारावीतील एका लहानशा खोलीत ५ ते ७ लोकं राहतात. यांत बहुतेक मजुरी करणाऱ्या लोकांची अधिक संख्या आहे. धारावीत असंख्य लहानमोठे व्यवसायही चालतात. इथं तुम्हाला हवी ती वस्तू मिळते. परंतु इथला राहणीमानाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. अनेक परदेशी कंपन्या पर्यटकांना धारावीत फिरवण्यासाठी खास टुरिंग पॅकेज आणि गाईड देखील उपलब्ध करून देत आहेत.  

आशियातील टॉप १० पर्यटनस्थळं 

  • उबूडमधील जंगली झोपाळा, उबूड, इंडोनेशिया
  • शिआनमध्ये फूड टूर, शिआन, चीन
  • बीजिंग हूटॉग फूड आणि बीयर टूर,
  • बीजिंग, चीन
  • थाय आणि आखा कुकिंग क्लास, चीआंग माय, थायलंड
  • हानोई स्ट्रीट फूड टूअर, हानोई, व्हिएतनाम
  • टोकियो बायकिंग टूर, रोपाँगी, जपान
  • कु ची टनलमधून स्पीडबोटने फेरी, हो ची मिंच शहर, व्हिएतनाम
  • अँगकोर कॅट टूर, सिम रिअॅप, कंबोडिया
  • क्रॅबी सनसेट क्रूझ, अॅओ नाग, थायलंड
  • धारावी टूअर, मुंबई, भारत 



हेही वाचा-

कलानगर येथील स्कायवॉक पाडण्यासाठी महामार्गावर मेगाब्लॉक

पालिकेवर टीका करणाऱ्या आरजे मलिष्काला पालिका आयुक्तांनी दिली पावसाळ्यातील कामाची माहिती



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा