महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात भुताटकी?

 CST
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात भुताटकी?
CST, Mumbai  -  

खरं तर श्रद्धा आणि अंधश्रद्धा या मानण्यावर आहेत. कुणी म्हणतं भूत आहे, तर कुणी म्हणतं भूत वगैरे काहीही नाही. भुताचा हा विषय घेण्यामागचं नेमकं कारण काय ? असं विचाराल तर मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या चर्चांकडे अंगुलीनिर्देश करावा लागेल. मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीत भूत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळत होती. त्याचा अनुभव नव्याने बनवण्यात आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतल्यावर तर सर्वांचाच थरकाप उडाला. पण आता या वास्तूतील दोष दूर केल्यानंतर दुष्ट शक्तींचा प्रभाव कमी झाल्याचे कर्मचारी सांगत आहेत.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतींमध्ये भुताचा वावर असल्याचा गोष्टी या परिसरातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांकडून नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र मुख्यालयाच्या विस्तारीत इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर बनलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन विभाग कार्यालयात भुताचा वावर असल्याचे ऐकून कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.

असे होतात विचित्र भास -

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे हे कार्यालय तळ मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले आहे. परंतु हे कार्यालय दुसऱ्या मजल्यावर हलवल्यानंतर पहिल्याच दिवशी आगीचे तिसऱ्या नंबरच्या कॉल्स मोठ्या प्रमाणात येवू लागले. त्यानंतर रात्रीच्यावेळी कर्मचाऱ्यांना आठ कर्मचारी असतानाही नऊ कर्मचारी दिसणे, काचांचा आवाज, चालण्याचा आवाज असे विचित्र भास व्हायला लागले. त्यामुळे रात्रीच्यावेळी येथे काम करणे कर्मचाऱ्यांना कठीण होत होते. परंतु आता वास्तूशांती आणि पूजा केल्यानंतर हे प्रकार काही प्रमाणात कमी झाल्याचे येथील कर्मचारी सांगतात.

'त्या'ची वाट येथूनच जाते - 

आपत्कालीन विभागाचे कार्यालय ज्याठिकाणी बनवण्यात आले, त्याठिकाणी प्रमुख लेखापाल, वित्त यांचे कार्यालय होते. प्रमुख लेखापालांच्या कार्यालयात अनेक वर्षे हाती पेटती समई घेतलेल्या महिलेचे तैलचित्र लावण्यात आले होते. त्यामुळे हे तैलचित्र या वास्तूदोषामुळेच लावले गेले असावे, असे बोलले जात आहे. परंतु येथील माहितगारांच्या माहितीप्रमाणे नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भूत असून त्याची वाट ही याच कार्यालयाच्या जागेतून जात असल्याचे बोलले जात आहे.

Loading Comments