Advertisement

पगार कापला! 'केईएम'च्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, रुग्ण वाऱ्यावर


पगार कापला! 'केईएम'च्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, रुग्ण वाऱ्यावर
SHARES

बायोमेट्रिक हजेरीमुळे कामावर उपस्थित असूनही अनेक कर्मचाऱ्यांचे पगार कापण्यात आले आहेत. त्यामुळे बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी परळच्या केईएम रुग्णालयातील कर्मचारी आणि नर्स यांनी सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान कामबंद आंदोलन पुकारलं. या आंदोलनामुळे जवळपास ३ तास एकही नर्स वा कर्मचारी रुग्णालयात उपलब्ध नव्हता. त्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे अतोनात हाल झाले.



का आले कर्मचारी एकत्र?

बायोमेट्रिक पद्धतीत हजेरीची योग्य प्रकारे नोंद न झाल्याने नर्स आणि कर्मचाऱ्यांना गैरहजर दाखवून त्यांचा पगार कापण्यात आला आहे. दर महिन्याच्या १ तारखेला नर्स आणि कर्मचारी विभागाचा पगार होतो. पण, ७ तारीख येऊनही कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत.

तसंच ज्या नर्स आणि कर्मचाऱ्यांचा पगार झाला, त्यांच्या पगारात तफावत आढळून आली आहे. या सर्व प्रकारासाठी बायोमेट्रिक हजेरी पद्धत जबाबदार असल्याचं सांगत ही पद्धत बंद करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह' शी बोलताना दिली.


रुग्णालयातील काम ठप्प

केईएमचे अधिष्ठाता डाॅ. अविनाश सुपे यांच्या ऑफिससमोर सकाळी ७ वाजेपासून हे सर्व कर्मचारी एकत्र झाले होते. १० वाजेपर्यंत घोषणाबाजी केल्यानंतर हे सर्व कर्मचारी आपापल्या विभागात परतले. परंतु तोपर्यंत तब्बल ३ तास रुग्णालयातील कामकाज ठप्प झालं होतं.



हजेरी नोंदवण्यात वेळ वाया

केईएम रुग्णालयात १५ हजार कर्मचारी आहेत. पण, त्यांच्यासाठी हजेरी नोंदवण्यासाठी असलेल्या बायोमेट्रिक मशीन्स देखील कमी पडतात. त्यामुळे वेळेवर पोहोचलो, तरी हजेरी नोंदवण्यासाठी रांगेत उभं राहावं लागतं.‌ अर्धा तास हजेरी नोंदवण्यातच जातो. परिणामी कर्मचाऱ्यांचा अर्ध्या तासाचा पगार कापला जातो, असंही काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे ही बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद करा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.


पुढचे २ दिवस असंच आंदोलन

शिवाय पुढचे २ दिवस अशा प्रकारे आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. जोपर्यंत ही बायोमेट्रिक हजेरी पद्धत बंद होत नाही. तोपर्यंत असंच एकत्र जमून निषेध नोंदवण्यात येणार असल्याचंही कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा