Advertisement

मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचं भवितव्य अधांतरीच, गट स्थापनेच्या याचिकेवर झाली सुनावणी


मनसेच्या 'त्या' नगरसेवकांचं भवितव्य अधांतरीच, गट स्थापनेच्या याचिकेवर झाली सुनावणी
SHARES

मनसेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या ‘त्या’ नगरसेवकांच्या राजकीय भवितव्यासंदर्भात गुरूवारी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी झाली. यामध्ये गट मान्यतेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या मुद्द्याची सुनावणी पूर्ण झाली असून नगरसेवकांच्या अपात्रतेच्या मुद्दयावरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे. या दोन्ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच या याचिकेवर निर्णय येणं अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे.


आक्षेप याचिका

मुंबई महापालिकेतील मनसेचे गटनेते दिलीप लांडे, दत्ता नरवणकर, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर, परमेश्वर कदम आणि अर्चना भालेराव आदी ६ नगरसेवकांनी पक्षांतर करत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेचा केवळ संजय तुर्डे हा एकच नगरसेवक राहिला आहे. त्यामुळे ‘त्या’ ६ नगरसेवकांच्या पक्षांतराविरोधात मनसेने कोकण विभागीय आयुक्तांकडे आक्षेप याचिका नोंदवली होती. 'त्या' ६ नगरसेवकांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र गटास मान्यता देऊ नये तसेच हे सर्व नगरसेवक मनसेच्या चिन्हावर निवडून आल्याने त्याची कृती पक्षविरोधी ठरवत त्यांचे नगरसेवक पदही रद्द करण्यात यावे, अशी मागणी मनसेने याचिकेद्वारे केली होती.


एक युक्तिवाद बाकी

त्यातील गट स्थापन करण्याच्या याचिकेवरील सुनावणी गुरुवारी कोकण विभागीय आयुक्तांकडे पार पडली आहे. या वेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपल्यावतीने युक्ती करत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे या मुद्द्यावर युक्तिवाद अद्याप बाकी आहे. त्यासाठी लवकरच सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्यावतीने आमदार अॅड अनिल परब तर मनसेच्यावतीने पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे व वकील अक्षय काशिद हे उपस्थित होते.



हेही वाचा-

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, भाजपाचं आव्हान घेतलं अंगावर


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा