Advertisement

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, भाजपाचं आव्हान घेतलं अंगावर


मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला,  भाजपाचं आव्हान घेतलं अंगावर
SHARES

भाडुंप पोटनिवडणुकीचा निकाल भाजपाच्या बाजूने लागल्यावर 'लवकरच मुंबईत आमचा महापौर' असं खुलं आव्हान भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आलं. हे आव्हान अंगावर झेलत अवघ्या एका रात्रीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ६ नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने भाजपाचं आव्हान मोडीत काढलं आहे. मनसेच्या या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडे नेऊन त्यांचा पाठिंबा घेण्याची शिवसेनेची रणनीती आहे.

भाडुंपच्या प्रभाग क्र. ११६ मधील पोटनिवडणुकीत भाजपा नगरसेविका जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवल्यावर मुंबई महापालिकेतील भाजपचं संख्याबळ ८३, तर शिवसेनेची संख्या ८४ झाली. शिवसेनेला ४ अपक्ष आणि भाजपला २ अपक्षांची साथ आहे.


हे आहेत नगरसेवक

  1. प्रभाग क्र. १२६ अर्चना भालेराव
  2. प्रभाग क्र. १३३ परमेश्वर कदम
  3. प्रभाग क्र. १५६ अश्विनी माटेकर 
  4. प्रभाग क्र. १६३ दिलीप लांडे
  5. प्रभाग क्र. १८९ हर्षिला मोरे
  6. प्रभाग क्र. १९७ दत्ता नरवणकर

मनसेशी एकनिष्ठ: 

  • प्रभाग क्र. १६६ संजय तुर्डे


चोख उत्तर

त्यामुळेच, 'मी उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान देतो, ही स्थिती लवकरच बदलून भाजप ८४ आणि शिवसेना ८३ अशी होईल आणि आमचा महापौर बसेल.' असं वक्तव्य खा. किरीट सोमय्यांनी केलं. या आव्हानाला चोख उत्तर देण्यासाठी एका रात्रीत डावपेच लढवत शिवसेनेने मनसेचे ४ ते ५ नगरसेवक आपल्याकडे खेचून घेण्याची चाल रचली. हे नगरसेवक खेचण्यात मोठा घोडेबाजार झाल्याचं म्हटलं जात आहे.


अशी रणनिती...

महापालिका अधिनियमातीतील तरतुदीनुसार पक्षाच्या एकूण संख्येच्या दोन तृतीयांश गट फुटून त्यांनी नवा गट तयार केला, तर त्यांच्याविरोधात पक्ष विरोधी कारवाई होत नाही. त्यामुळेच मनसेच्या ७ पैकी ४ ते ५ नगरसेवकांना फोडून त्यांचा वेगळा गट करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केल्याचं म्हटलं जात आहे.


सोमय्यांची तक्रार 

मनसेच्या नगरसेवकांना कोकण विभागीय आयुक्तांकडे नेऊन त्यांचा पाठिंबा घेण्याची रणनीती शिवसेनेने खेळली असून ही खेळी लक्षात येताच भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी कोकण विभागीय आयुक्त, लाचलुचपत विभाग, पोलिसांना पत्र पाठवून या सर्व नगरसेवकांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.



काय म्हटलंय पत्रात?

मुंबई महापालिकेतील आमच्या मित्रपक्षांनी जवळजवळ ४ नगरसेवकांना `किडनॅप` केलं आहे. त्यांना २-४ कोटी रुपयांचं आमिष पण दाखवण्यात आलं आहे, त्यातील एक नगरसेवक घाटकोपरचा आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी आम्हाला हे कळवलं आहे. यासंबंधी मी निवडणूक आयोग, पोलीस या सर्वांशी चर्चा करून ताबडतोब कारवाई करण्याची मागणी खा. सोमय्या यांनी केली आहे.




एक सुनावणी हवी

शिवसेनेने आमच्या ७ पैकी २ नगरसेवकांशी संपर्क झाल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात मनसेने कोकण विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून या नगरसेवकांच्या गटाला मान्यता देण्यापूर्वी मनसेला एक सुनावणी देण्याची मागणी केली आहे. याबाबतचं पत्र आम्ही त्यांना फॅक्स तसेच मेलद्वारे पाठवलं आहे.

- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे 


शिवसेना घाबरलीय

भांडुपच्या विजयानंतर भाजपाची मुंबई व महाराष्ट्रात जी घोडदौड सुरू आहे, ते पाहून शिवसेना घाबरली आहे. त्यातूनच शिवसेना हे कृत्य करायला निघाली आहे. जे नगरसेवक त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना त्वरीत अटक व्हावी आणि त्या सर्वांची चौकशी करावी अशी मागणी आमच्या पक्षाच्या खासदारांनी केली आहे.

- मनोज कोटक, गटनेते, भाजपा



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा