प्लास्टिक बंदीला लालबागच्या राजाचा पाठिंबा

प्रशासनाच्या प्लास्टिक बंदीच्या मोहिमेत आता मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव समितीनेही सहभाग घेतला असून यंदा लालबागच्या राजाची आरास बनवण्यासाठी कमीत-कमी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करण्याचं उद्दिष्ट्य समितीने समोर ठेवलं आहे.

SHARE

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असून मुंबईसह राज्यभरात २३ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महापालिकेनेही या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. कारवाईसोबतच प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी महापालिकेकडून जनजागृतीही केली जात आहे. प्रशासनाच्या प्लास्टिक बंदीच्या मोहिमेत आता मुंबईतील लालबागचा राजा गणेशोत्सव समितीनेही सहभाग घेतला असून यंदा लालबागच्या राजाची आरास बनवण्यासाठी कमीत-कमी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करण्याचं उद्दिष्ट्य समितीने समोर ठेवलं आहे.
नियम मोडणाऱ्यांना दंड

प्लास्टिकबंदीच्या निर्णयानुसार २३ जूनपासून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या नागरिकांसह फेरीवाल्यांना २०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणारा आहे. हा दंड पहिल्यांदा गुन्हा केल्यास आकारला जाणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा आढळल्यास ५०० ते २००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. मुंबई महापालिकेने प्लास्टिक पिशव्यांचं उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वेगळं पथक तयार केलं आहे.


राजाचं पाद्यपूजन

लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा म्हणजे राजाची मूर्ती घडवण्याची सुरूवात. 'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाचा ८५ वा पाद्य पूजन सोहळा मंगळवारी १९ जूनला करण्यात आला. हा पाद्यपूजन सोहळा हनुमान मंदिर, लालबाग इथं झाला. यावेळी हनुमान मंदिरासह संपूर्ण मंडप वेगवेगळ्या फुलांनी सजवण्यात आलं होतं. या सोहळ्याला मुंबईतल्या हजारो गणेशभक्तांनी गर्दी केली होती.

लालबागच्या राजाचं मखर आणि देखावा म्हणजे मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. गणेशोत्सवात सलग १० दिवस हा देखावा बघण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या थीमवर आधारीत देखावा साकारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. या देखाव्यात प्लास्टिक आणि प्रामुख्याने थर्माकोलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पण प्लास्टिकबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी समितीने यंदा सजावटीत प्लास्टिक आणि थर्माकोल न वापरण्याचा निर्णय घेतला आहे.


प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे यंदा आम्ही सजावटीतून इकोफ्रेंडली मेसेज देण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या १० वर्षांपासून मी लालबागच्या राजाच्या चरणी माझी सेवा देतोय. राजाच्या मंडपाची सजावट करताना दरवर्षी नवीन कल्पना आम्ही राबवत असतो. यंदा पर्यावरण वाचवण्याचा एक अतिशय वेगळा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
-नितीन चंद्रकांत देसाई, कला दिग्दर्शक


यंदा लालबागच्या राजाची आरास बनवताना त्यात आम्ही थर्माकोलचा वापर करणार नाही. प्रशासनानेन घेतलेल्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा राहिल. प्लास्टिकचा वापर जितका टाळता येईल तितका टाळण्याचा आम्ही प्रयत्न करू.
-बाळासाहेब कांबळे, अध्यक्ष, लालबागचा राजा समिती


घरगुती गणपती असो किंवा सार्वजनिक मंडळांद्वारे साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव. सर्वांनी लालबागचा राजा गणेशोत्सव समितीप्रमाणे देखाव्यांमध्ये प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर न करण्याचं ठरवलं, तर प्रशासनाच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला मोठा हातभार लागेल, असंच यावरून म्हणता येईल.हेही वाचा-

कोळीगीतात रंगली मेनकारूपी पौर्णिमासंबंधित विषय
ताज्या बातम्या