Advertisement

मदत कसली करता? इमारती दुरुस्त करा! - शिवसेनेचा सरकारला टोला


मदत कसली करता? इमारती दुरुस्त करा! - शिवसेनेचा सरकारला टोला
SHARES

मुंबईतील अनेक धोकादायक इमारती दुरुस्ती न केल्यामुळे पडून दुर्घटना घडत आहेत. अशा दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांना दोन-पाच लाखांची आर्थिक मदत केली जाते. एवढीच लोकांच्या जीवाची किंमत आहे का? असा सवाल सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला. लोकांचे जीव गेल्यानंतर त्यांना मदत करण्यापेक्षा तीच रक्कम जर इमारत दुरुस्तीवर खर्च केली, तर अनेक जीव वाचवता आले असते, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले.


ट्रस्टच्या सर्व परवानग्या रद्द करा!

भेंडीबाजार येथील अल हुसैन इमारत दुर्घटना घडून ३४ जणांचा मृत्यू झाला आणि १३ लोक जखमी झाले. या दुर्घटनेतील मृतांना महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोक प्रस्तावावर बोलताना यशवंत जाधव यांनी घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटना घडल्यानंतर त्वरीत संबंधितांविरोधात कारवाई केली. मग भेंडीबाजारातील इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या साबुसिद्दिकी बुऱ्हाणी ट्रस्ट अर्थात 'एसबीयूटी' विरोधात कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या ट्रस्टला दिलेल्या सर्व परवानग्या रद्द करण्यात याव्यात, अशी मागणीही जाधव यांनी केली. किती मृत्यू झाल्यानंतर सरकारला जाग येणार आहे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.



'इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा'

सी विभागाच्या एकत्रित पुनर्विकासाअंतर्गत या इमारतीचा सामावेश होता. त्यामुळे या इमारतीवर ट्रस्टचा अधिकार होता. परंतु त्यांनी येथील रिकामी जागा भाड्याने दिली होती. त्यामुळे त्या ट्रस्टवर कारवाई करायला हवी, अशी मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. तसेच येथील सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट म्हाडामार्फत केले जावे, यासाठी महापौरांनी सरकारला पत्र लिहून एक ठोस धोरण आखण्याची विनंती करावी, असेही रईस शेख यावेळी म्हणाले.


तर संक्रमण शिबिरात जाणार कोण?

माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या संक्रमण शिबिरांची दुरवस्था झाली आहे. तेथील रहिवासी मरणयातना सहन करत आहेत. जर या संक्रमण शिबिरातील घरे राहण्यायोग्य असती, तर कोण संक्रमण शिबिरात जाणार नाही? असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. त्यामुळे या भागातील ज्या काही १४ ते १६ हजार जुन्या इमारती आहेत, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जावे, अशी मागणी करत रवी राजा यांनी या दुर्घटनेत कामगिरी निभावणाऱ्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफ जवानांचे विशेष आभार मानले.


'बीपीटीच्या जागेवर संक्रमण शिबीर बांधा'

काँग्रेसचे जावेद जुनेजा यांनी येथील जुन्या इमारतींसाठी बीपीटीच्या जागेवर संक्रमण शिबीरे बांधली जावीत, अशी सूचना केली. तर, शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी धोकादायक इमारतींबाबत ठोस उपाययोजना निश्चित करावी. तसेच, जिथे जिथे अनधिकृत बांधकाम होईल, तिथे महापालिकेने त्वरीत नोटीस देऊन कारवाई करावी, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, यावेळी झालेल्या शोक प्रस्तावांमध्ये माजी नगरसेवक विनोद शेखर आणि पुरात मृत्यूमुखी पडलेल्या मृतांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा