संक्रमण शिबिरार्थी मृत्यूच्या सावटाखाली

Mumbai
संक्रमण शिबिरार्थी मृत्यूच्या सावटाखाली
संक्रमण शिबिरार्थी मृत्यूच्या सावटाखाली
संक्रमण शिबिरार्थी मृत्यूच्या सावटाखाली
See all
मुंबई  -  

चारही बाजूने टेकू लावलेले, अतिशय जीर्ण, कोणत्याही क्षणी कोसळते की काय अशी अवस्था...ही परिस्थिती मुंबई महागनर पालिकेच्या वा म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीची किंवा खासगी इमारतींची नाही. तर ही अवस्था आहे, म्हाडाच्या मुंबईभरातील जुन्या संक्रमण शिबिरांची. विक्रोळी कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिर तर गेल्या कित्येक वर्षांपासून टेकूवरच उभे आहे. तर काळाचौकी जिजामातानगर, चेंबुर सुभाष नगर, बोरीवली मागाठणे, जय महाराष्ट्रनगर ट्रान्झिट कँम्प यासह म्हाडाची अनेक संक्रमण शिबिरे आज धोकादायक परिस्थितीत असून यातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. पण म्हाडाकडून मात्र या संक्रमण शिबिराकडे लक्षच दिले जात नसल्याचे म्हणत संक्रमण शिबिरार्थींमध्ये प्रचंड नाराजी आहे. तर उद्या घाटकोपरसारखी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता या संक्रमण शिबिरार्थींकडून विचारला जात आहे.

आयुष्यच अतिधोकादायक

उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी मुंबईभर म्हाडाने 52 संक्रमण शिबिरे बांधली. या संक्रमण शिबिरात हजारो रहिवाशांना स्थलांतरीत केले. अतिधोकादायक इमारत म्हणून काही वर्षांपासून ज्या रहिवाशांना म्हाडाने संक्रमण शिबिरात  स्थलांतरीत केले तेच रहिवाशी पुन्हा मृत्यूची टांगती तलवार घेऊन अतिधोकादायक संक्रमण शिबिरात राहत आहेत. त्यामुळे आमचे आयुष्यच अतिधोकादायक असल्याची तिखट प्रतिक्रिया संक्रमण शिबिरातील शिबिरार्थी देताना दिसतात.

जुनी झाल्याने अनेक संक्रमण शिबिरे अतिधोकादायक झाली आहेत. जिजातामातानगर, मागाठणे आणि विक्रोळीसह अन्य ठिकाणच्या संक्रमण शिबिरार्थींना म्हाडाने नोटीसा पाठवत नव्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्याचे आदेश दिले आहेत. जिवितास धोका असल्याचे सांगत या नोटीसा पाठवल्या आहेत. पण शिबिरार्थी मात्र आता एका नरकातून दुसऱ्या  नरकात जायला तयार नाहीत. आमचे आयुष्यच संक्रमण शिबिरात गेले आता पुढचे आयुष्यही संक्रमण शिबिरातच काढायचे का? असा संतप्त  सवाल करत त्यांनी हक्काची घरे त्याच ठिकाणी देण्याची मागणी केली आहे. मात्र या मागणीकडेही म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून काणाडोळाच केला जात आहे.देखभाल बंद

जुनी संक्रमण शिबिरे अतिधोकादायक झाल्याचे म्हणत म्हाडाने या संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाचा घाट घातला आहे. त्यामुळेच संक्रमण शिबिरार्थींना गोराईतील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा पाठवल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे आता पुनर्विकास होणार, असे म्हणत दुरूस्ती मंडळाने या संक्रमण शिबिरांची देखभालच बंद केल्याचा आरोप ट्रान्झिस्ट कँम्प असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत पेठे यांनी केला आहे. पाच वर्षांपासून संक्रमण शिबिरांची देखभाल-दुरूस्ती होत नसल्याने शेकडो रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहेत आणि आता यातून काही दुर्घटना झाली तर त्याला म्हाडाच जबाबदार असेल. कारण हा प्रश्न मार्गी लावावा, त्यासाठी ठोस धोरण तयार करावे अशी मागणी आम्ही वारंवार म्हाडाकडे करत आहोत, पण म्हाडाकडून त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे, असेही पेठे यांनी सांगितले आहे.


आम्हाला वालीच नाही


दक्षिण मुंबईतल्या हक्काच्या घरातून बाहेर काढले आणि इथे मागाठाण्यातील संक्रमण शिबिरात म्हाडाने आणून टाकले. आज ना उद्या हक्काचे घर मिळेल, याच आशेवर आमच्या दोन पिढ्या गेल्या. पण हक्काचे घर काही मिळाले नाही. त्यातच आता जे छप्पर डोक्यावर आहे ते ही धोकादायक झाले असून आमच्या संक्रमण शिबिराची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे कधी काय होईल ही धाकधुक मनात असते. पण म्हाडा काही लक्ष देत नाही. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची. आता तर आमची खात्रीच झाली आहे की संक्रमण शिबिराला आणि त्यात राहणार्या रहिवाशांना कोणी वालीच नाही.

प्रभाकर माजगावकर, रहिवासी, जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे संक्रमण शिबिर

जिजामाता नगर, काळाचौकी संक्रमण शिबिरात आम्ही गेल्या 17 वर्षांपासून रहातोय. आता या संक्रमण शिबिराची दुरावस्था झाली असून गेल्या वर्षी म्हाडाने इमारत धोकादायक असल्याचे म्हणत गोराईतील संक्रमण शिबिरात स्थलांतरीत होण्याचे आदेश देणार्या नोटीसा पाठवल्या आहेत. पण 17 वर्षांपूर्वी हक्काच्या घरातून संक्रमण शिबिरात आलो आणि आता पुन्हा काळाचौकीवरून पुन्हा दुसर्या संक्रमण शिबिरात तेही गोराईला जायचे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला जवळपासच नवे संक्रमण शिबिर मिळावे आणि त्यासाठी आम्ही म्हाडाकडे पाठपुरावा करत आहोत.

विराज तोडणकर, रहिवासी, जिजामातानगर- काळाचौकी म्हाडा संक्रमण शिबिर

आमच्या मरणाची वाट पाहाताहेत काय?

42 वर्षांपासून संक्रमण शिबिरात रहातोय. सगळीकडे टेकू, इमारतीला तडे सगळीच दुरावस्था. कधी काय होईल याचा नेम नाही. इतकेच काय तर आमच्या इमारतीतील मुला-मुलींची लग्नही होत नाहीत. असे असतानाही म्हाडा मुग गिळून गप्प आहे. आमच्या मरणाची वाट म्हाडा पाहतेय का एवढाच आमचा सवाल आहे. पण आता आम्ही गप्प बसणार नाही, म्हाडाविरोधात गुन्हाच दाखल व्हायला हवा आणि तो मी करणारच.

रवी पाबेरकर, रहिवासी कन्नमवारनगर संक्रमण शिबिर


या मुद्द्यावरून म्हाडाच्या अधिकाऱ्यांची विचित्र कोंडी झाली आहे. म्हाडावरचा विश्वास उडालेल्या रहिवाशांना सुरक्षित घरकुलाची खात्री देत त्यांचे मन वळविण्याचे म्हाडाचे प्रयत्न सुरुच आहेत. धोकादायक संक्रमण शिबिरातील रहिवाशांना आम्ही याआधीच नोटीसावर नोटीसा बजावत इतरत्र स्थलांतरीत होण्याची विनंती केली आहे. त्यानुसार गोराईत नवीन संक्रमण शिबिरांचीही व्यवस्था केली आहे. पण हे रहिवाशी स्थलांतरीत होण्यास नकार देत असल्याने आमच्याही अडचणी वाढत आहेत. रहिवाशांना तिथेच नवीन घरे बांधून हवी आहेत. त्यामुळे आता सरकारच यावर निर्णय घेईल. पण हा निर्णय होईपर्यंत रहिवाशांनी जीव मुठीत घेऊन न जगता नव्या संक्रमण शिबिरात स्थलांतरीत व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

वरिष्ठ अधिकारी, मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळ, म्हाडा

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.